कोल्हापूर प्रतिनिधी : राष्ट्रवादीने २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. २०१७ लाही तेच आणि २०१९ ला काय घडलं ते तुम्ही पाहिले. या घडामोडी केल्या नसत्या तर आजची ही परिस्थिती घडलीच नसती, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.
कोल्हापुरातील आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, माझ्यावर आरोप करायला जागाच नसल्यामुळे असल्या बारीक -सारीक गोष्टी ते शोधत आहेत.
१९९८ साली हसन मुश्रीफ यांना अनेकांचा विरोध असूनही उमेदवारी दिल्याचा दाखला आमदार रोहित पवार देत आहेत. याबद्दल प्रतिक्रिया विचारल्यावर ते म्हणाले, त्यावेळी मी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखालीच लढलो. मग विरोध कोणाचा होता सांगा ना. कोल्हापुरात मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढला नाही, या आमदार रोहित पवार यांच्या आरोपावर श्री. मुश्रीफ म्हणाले, पुण्यामध्ये तरी सगळेच खासदार आणि आमदार आमचे कुठे निवडून आले आहेत? तिथे आमचे दोन-तीनच आमदार आले होते. निवडणुका ह्या त्या -त्या वेळच्या परिस्थिती आणि वातावरणावर अवलंबून असतात.
पवारसाहेब दैवत आणि वडीलधारेच……!
खासदार शरद पवार यांच्या जाहिराती आणि पोस्टरवरील फोटोबाबत बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, श्री. पवारसाहेब हे आमचे नेते होते. त्यांच्यामुळेच राजकारणात आम्हाला स्थान मिळालेले आहे, हे आम्ही कधीच नाकारत नाही. ते आमचे दैवत आहेत आणि असतील. “आमचे दैवत” या भावनेपोटीच आम्ही त्यांचा फोटो लावतो. परंतु; या मुद्द्यावर ते जर कोर्टातच जाणार असतील तर आम्ही काय करणार? कोल्हापुरात लागलेल्या “बाप बाप होता है….” या पोस्टरबाबत प्रतिक्रिया विचारल्यावर श्री. मुश्रीफ म्हणाले, “ते वडीलधारेच आहेत.”
आमदार रोहित पवार कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मंत्री हसन मुश्रीफ यांची दहशत आहे, असा आरोप करीत आहेत. या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आता पत्रकारांनी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन कारखानदारांच्या मुलाखती घ्याव्यात. मग समजेल दहशत आहे की नाही. उद्योग वाढलेले नाहीत म्हणता, आजमितिला तिथे एक इंचही जागा शिल्लक नाही एवढे उद्योग वाढलेले आहेत. प्रश्न राहतो नोकऱ्यांचा. पंचतारांकित एम.आय.डी.सी. साठी जमीनी गेलेल्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मी आग्रही राहणारच.