Home राजकीय केंद्रात अन् राज्यात आमची सत्ता असताना तुम्ही निधी परदेशातून आणता का..? : आशिष ढवळे

केंद्रात अन् राज्यात आमची सत्ता असताना तुम्ही निधी परदेशातून आणता का..? : आशिष ढवळे

by Nitin More

कोल्हापूर प्रतिनिधी : ज्यांचे नेतेच दुसऱ्याचे श्रेय लाटतात त्यांनी टीका करणे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी शारंगधर देशमुख यांच्यावर केली. माजी आमदार अमल महाडिक यांनी पद नसतानाही कोट्यवधींचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणला याचा पोटशूळ विरोधकांना उठल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन आणि अमृत योजनेतील विकास कामांची उद्घाटने सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील हे काका पुतणे करत सुटले आहेत. महादेव जानकर हे महायुतीतील नेते आहेत आणि त्यांच्या शिफारसीनुसार मिळालेला हा निधी आहे. उद्घाटने घेऊन विकासकामांचे श्रेय घेण्याचे काम सतेज पाटलांच्या बगलबच्चांनी करू नये असा इशाराही ढवळे यांनी दिला.

सतेज पाटील यांच्या मर्जीतील काही ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे काही विकास कामे केली आहेत आणि नंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवली आहे. हे उघड झाल्यामुळेच देशमुख यांचा तोल ढासळला आहे. लवकरच यावरही कारवाई होईल आणि सत्य उजेडात येईल असेही ढवळे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात सत्ता आमची असताना तुम्ही निधी परदेशातून आणता की काय? असा उपरोधिक सवालही ढवळे यांनी केला.

काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणामुळे देश पिछाडीवर राहिला होता पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमुळे देशाची प्रगती जोमाने होत आहे. हे जनतेच्या लक्षात आले आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस कोल्हापुरातून हद्दपार होईल असा विश्वासही ढवळे यांनी व्यक्त केला.

Related Posts

Leave a Comment