गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टँलेन्ट कन्सोल ग्लोबल फौंडेशनमार्फत (टिसीजी) बेबी फुटबॉल लिगला प्रांरभ झाला. पहिल्या दिवशी बारा वर्षे गटात दिनकरराव शिंदे विद्यालय,काळू मास्तर विद्यालय यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. शिवराज स्कुल, सर्वोदया स्कुल, छत्रपती शिवाजी विद्यालयाने पहिल्या सामन्यात विजय नोंदवून चांगली सुरवात केली. येथील दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेचे सहावे वर्ष आहे. स्पर्धेत एकुण २३ संघानी सहभाग घेतला आहे.
सायंकाळी चार वाजता टिसीजी फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद इंचनाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद, खजिनदार महादेव पाटील,टिसीजीचे गंगाराम नाईक,राजू भोपळे,संजय पाटील,प्रसाद गवळी यांच्यासह खेळाडू व क्रीडाशिक्षक उपस्थित होते. समन्वयक हर्षल कुरळेने स्वागत केले. यश पाटील यांनी आभार मानले. हुल्लापा सुर्यंवंशीने सूत्रसंचालन केले. हुकमी खेळाडू स्वयंम शेटकेच्या निर्णायक गोलच्या जोरावर छत्रपती शिवाजी विद्यालयाने काळू मास्तर विद्यालयाला नमविले. काळू मास्तरच्या अमन पटेल,प्रेम कांबळे, शब्बीर हेब्बाळेचे बरोबरीचे प्रयत्न अपुरे पडले.
सर्वोदया स्कुलने वि.दि. शिंदे हायस्कुलचा २-० असा पराभव केला.सर्वोदयाच्या श्रेयस पाटीलने दोन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. शिंदेच्या वेदांत किल्लेदारने चांगला खेळ केला. निशांत पुजारीच्या महत्वपूर्ण गोलमुळे दिनकरराव शिंदे विदयालयाने नवोदित साई इंटरनँशनल स्कुलला १-० असे हरविले. दहा वर्षे गटात शिवराज स्कुलने सर्वोदयावर २-० अशी मात केली. शिवराजच्या प्रतिक कांबळे, अँरोन बार्देस्करने गोल मारले.काळू मास्तर विद्यालयाने साई इंटरनँशन स्कुलचा ४ गोलनी सहज पराभव केला. काळू मास्तरच्या शब्बीर हेब्बाळेने दोन तर प्रेम कांबळे, आर्यन पटेलने प्रत्येकी एक गोल केला.