गडहिंग्लज प्रतिनिधी : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील अमृत गुंडू शिंत्रे (वय ६५) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. इंचनाळ गावातील हे तिसरे नेत्रदान ठरले. तर चळवळीतील १३४ वे नेत्रदान आहे.


अमृत शिंत्रे नेत्रदान चळवळीत प्रारंभापासूनच सक्रिय होते. आपल्या इंचनाळ गावात नेत्रदान चळवळ रुजावी यासाठी ते प्रयत्नशील होते. गुरुवारी (ता.११) सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात आणले होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शिंत्रे यांच्या चळवळीतील सहभागाची कल्पना कुटुंबीयांना होती. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी मरणोत्तर नेत्रदानास संमती दिली. त्यानंतर येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.

अमृत शिंत्रे पाटबंधारे विभागातून हजेरी लिपीक या पदावरुन निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी (ता.१४) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.



