गडहिंग्लज प्रतिनिधी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या रूपाने मी सातव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. गेल्या सहा निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही मला आशीर्वाद द्या. तुमचा भाऊ आणि मुलगा समजून ओट्यात घ्या आणि मायेची उब द्या, असे भावनिक आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. निवडणुकीच्या तयारीची सुरुवात म्हणून गावागावात वाड्या -वस्त्यांवर जनतेपर्यंत पोहोचा. येत्या विधानसभा निवडणुकीत असा देदीप्यमान विजय मिळवूया कि, पुढच्या पाच वर्षात निवडणुकीला उभे राहण्याचेसुद्धा कुणाचं धाडस होणार नाही, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष युवराज पाटील होते. या मेळाव्याच्या माध्यमातून मंत्री श्री. मुश्रीफ यांनी विधानसभेचे रणसिंग फुंकले आहे.
भाषणात पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले गेली ४० वर्षे सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये जनतेने मला भरभरून दिले आहे. त्यापैकी तुम्ही मला २५ वर्ष आमदारकी दिली, या काळात १९ वर्षे मंत्रीपदी राहिलो. आपला आमदार भेटावा ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. संपर्कामध्ये कधीही कमतरता ठेवली नाही. सामान्यतील सामान्य अगदी एक जरी माणूस येऊन म्हणाला की, मी घरात असून भेटलो नाही किंवा फोन उचलला नाही तर या निवडणुकीचा अर्ज सुद्धा भरणार नाही. जनतेने मला जी संधी दिली त्यामध्ये व्यक्तिगत कामे व योजना प्रभावीपणे राबविल्या.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, मला तुम्ही कंटाळला तर नाही ना? मला कंटाळला असाल तर जरूर स्पष्टपणे सांगा. दुसरा कुणीतरी उमेदवार काढू. माझ्या चुकासुद्धा तोंडावर सांगा, माफी मागेन. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे शंभर टक्के समाधान करता येत नाही. परंतु काही राहून गेले असल्यास जरूर सांगा ते पूर्तता करण्याचाही प्रयत्न करू. त्यावर उपस्थित कार्यकर्ते म्हणाले, साहेब…! “तुम्हीच आमचा हक्काचा माणूस” “तुम्हीच गोरगरिबांचा कैवारी”
शंभर दिवस माझ्यासाठी द्या….
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, मी संपूर्ण आयुष्य गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी खर्ची घातले आहे. येत्या विधानसभेला फक्त शंभर दिवस शिल्लक राहिले आहेत. या शंभर दिवसात इर्षेने पेटून उठा, जनतेच्या घरोघरी पोहोचा. परगावच्या मतदानाची यादी तयार करा. हे शंभर दिवस तुम्ही माझ्यासाठी देणार असाल तरच फॉर्म भरूया.
बेरोजगारांना रोजगार….
पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारी हटवण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहिलो. येत्या पाच वर्षात एक मोठा कारखाना उभा करू. ज्यामध्ये दोन हजाराहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळेल,असेही ते म्हणाले.
पाऊस मतांचा…
प्रास्ताविकपर भाषणात प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, नामदार हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेतृत्व लाभावे, ही आपणा सर्वांची पुण्याई आहे. या मेळाव्याचे नियोजनकरीत असतानाच काल रात्रीपासूनच या हंगामाची सुरुवात जोरदार पावसाने झाली आहे. मंत्री मुश्रीफसाहेब यांच्या विधानसभा निवडणुकीतही असाच मतांचा पाऊस पाडूया, असे म्हणताच उपस्थीतातून टाळ्यांचा कडकडाट झाला. मंत्री श्री. मुश्रीफसाहेब हेच महायुतीचे उमेदवार असतील. विरोधी उमेदवार कोण असेल हे माहीत नाही. घराघरात जा आणि इर्ष्येने काम करा, असेही ते म्हणाले.
यावेळी गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष किरणअण्णा कदम, चंद्रकांत पाटील, विजय काळे आदी प्रमुखांची भाषणे झाली. तर कागल शहरातील देवराज बेळकट्टी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी समरजीत घाटगे यांच्या गटातून मुश्रीफ गटामध्ये प्रवेश केला. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, तात्यासाहेब पाटील,वसंतराव धुरे,किरणअण्णा कदम,शशिकांत खोत, प्रवीणसिंह भोसले,विकास पाटील,सिद्धार्थ बन्ने,संजय चितारी, सदानंद पाटील,बाळासाहेब देसाई, अनुप पाटील,दीपक देसाई,डी.एम. चौगुले,सूर्यकांत पाटील,काशिनाथ तेली, आर.व्ही.पाटील,रावसाहेब खिलारे,बाळासाहेब तुरंबे,पैलवान रवींद्र पाटील,ॲड.जीवनराव शिंदे, सदाशिव तुकान,प्रकाशराव गाडेकर आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत नितीन दिंडे यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले.