गडहिंग्लज प्रतिनिधी : राज्यातील नामवंत कीर्तनकार प्रा. नितेश रायकर महाराज यांचा भव्य कीर्तन सोहळा उद्या दूरचित्रवाणीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय मराठी वाहिनी ‘झी टॉकीज’ वर हा कीर्तन सोहळा (ता-१६) रोजी सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत प्रसारित होणार आहे. अध्यात्म, भक्ती आणि सामाजिक संदेशांचा सुंदर संगम या कीर्तनातून अनुभवता येणार आहे.


आपल्या अभ्यासपूर्ण वाणीने आणि प्रभावी सादरीकरणाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे प्रा.रायकर महाराज गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पूर या गावचे असून यांच्या कीर्तनाची उत्सुकता भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कीर्तनातून संतपरंपरा, मूल्यसंस्कार आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांचे प्रभावी दर्शन घडणार आहे. भाविकांनी व रसिक प्रेक्षकांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हितचिंतकांकडून करण्यात आले आहे.



