गडहिंग्लज प्रतिनिधी : स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांनी अयोध्येच्या आधी कागलमध्ये श्रीराम मंदिर उभारले. त्याचप्रमाणे गडहिंग्लजमध्ये सुद्धा राजकारणविरहित एकत्र येऊन भव्य-दिव्य श्रीराम मंदिर उभारूया. त्यासाठी गडहिंग्लज-आजरा चंदगडकरानी एकत्र यावे. असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला. येथील गांधी नगरमधील गणेश हॉलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते उपस्थित होते. राजकिय सामाजिक कला क्रीडा कृषी अशा विविध क्षेत्रातील नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव बरगे होते.
आज सकाळी त्यांनी ग्रामदैवत काळीभैरीचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर भव्य मोटर सायकल रॅली काढून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप केले व गुणवंत नागरिकांचा सत्कार केला.
श्री घाटगे पुढे म्हणाले, पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे श्रीराम मंदिर साकारत आहे. प्रभू श्रीरामांच्या मंदिरांची जिल्ह्यात संख्या कमी आहे. हिंदू धर्मियांसह सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामांचे मंदिर गडहिंग्लजमध्ये साकारल्यामुळे तिरुपती नंतर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जाण्याआधी गडहिंग्लज व कागल मधील श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येतील. त्यामुळे पर्यटनात वाढ होईल. लोकवर्गणी लोकसहभागासह शासनाच्या माध्यमातून या मंदिरासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय संकपाळ,पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश पाटील,दत्तोपंत वालावलकर,माजी जिल्हा परिषद सदस्य गणपतराव डोंगरे,विठ्ठल पाटील,एस.के.कुलकर्णी,सुदर्शन चव्हाण,रविंद्र घोरपडे,शैलेश कावणेकर,शैलेश मुळीक प्रवीण लोकरे,सदानंद पाटील,द्राक्षायणी घुगरी,निलांबरी भुईंबर,प्रतिभा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे, डॉ.अनिता चौगुले,अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत,प्रा.रमेश पाटील,संजय बटकडली,करंबळीचे माजी सरपंच प्रवीण माळी,भिमराव कोमारे,संजय धुरे,जनार्दन निऊंगरे,संतोष पाटील,अझहर बोजगर,आशितोष उपराटे,परमेश्वरी पाटील आशा देवार्डे,महादेवी मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे, यांनी केले. अजित जामदार यांनी सुत्रसंचलन केले तर आभार शहराध्यक्ष सुदर्शन चव्हाण यांनी मानले.
प.पू.बसवकिरण स्वामीजींनी दिले आशीर्वाद
वडरगे रोडवरील बेलबाग येथील श्री.जडेयसिद्धेश्वर आश्रममध्ये प.पू.बसवकिरण स्वामीजी यांचे दर्शन श्री.घाटगे यांनी घेतले. स्वामीजींनी त्यांचा सत्कार केला. लोक कल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन साधुसंत महंत आपल्या परीने धर्मरक्षण व जनसेवा करीत आहेत. अशा शब्दात शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करून पुढील महिन्यात होणाऱ्या पटाधिकार सोहळ्याचे विशेष निमंत्रण दिले. तसेच श्री घाटगे यांना स्वामीजींनी त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यासाठी आशीर्वादही दिले.