गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज, आजरा तालुक्यात सुरु असलेल्या नेत्रदान चळवळीचा तेरावा वर्धापनदिन रविवारी (ता.२८) होणार आहे. इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतसमोर सायंकाळी सातला हा कार्यक्रम होईल. नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती आहे. त्यांच्या हस्ते गेल्या वर्षभरातील २७ नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.


मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा प्रारंभ केलेल्या अत्याळसह करंबळी, बेळगुंदी, भडगाव, कौलगे, ऐनापूर, सरोळी (ता. आजरा) या गावात प्रत्यक्ष काम सुरु आहे. यासह २४ गावातून १३४ लोकांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. येथील अंकूर आय हॉस्पिटलमध्ये शासनाने मंजूर केलेल्या आय बँकत नेत्रप्रत्यारोपनाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच नेत्रप्रत्यारोपनातूनही दृष्टी मिळू शकत नाही अशा अंधांसाठी कचेरी मार्गावर रोजगार केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या नऊ अंधांकडून एलईडी बल्ब, लायटींग माळा, कापडी पिशव्या,आकाश कंदिल तयार केल्या जातात.

दरवर्षी राज्यभरातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत चळवळीचा वर्धापनदिन कार्यक्रम होतो. यंदा नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्तितीत कार्यक्रम होणार आहे. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांचीही उपस्थिती आहे. या कार्यक्रमात धोंडीबा कुंभार, मनोहर मगदूम,दौपदा पाटील, आक्काताई गोते,लता मगदूम (सर्व बेळगुंदी), मनोहर नांगरे,विठाबाई पाटील,नारायण कुपन्नावर,शांता गड्डी, शांताबाई घोटणे (सर्व गडहिंग्लज), शामराव गाडीवड्ड,बंडू माने,एस.आर. पाटील,सरस्वती पाटील,गंगुबाई बाटे (सर्व अत्याळ), बायाक्का रायकर, गंगुबाई कानडे (शिप्पूर तर्फ आजरा), सुशीला चव्हाण-पाटील,आप्पा केसरकर (सरोळी), सुशीला पाटील, अमृत शिंत्रे (इंचनाळ), सिताराम जाधव (करंबळी), ताराबाई कागवाडे (ऐनापूर), रत्नाबाई सावंत (कौलगे), अरविंद चव्हाण (नूल), रोहित विभुते (उत्तूर), अभिनव कांबळे (कडगाव, ता. भुदरगड) या नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम करणारे डॉ.लहाने.!

पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यातील माकेगाव. लहान वयातच त्यांच्या दोन्ही किडण्या काम करीत नसल्याने आईने आपली एक किडणी त्यांना दान केली आहे. मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज व जे.जे.हॉस्पिटलचे डीन म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. डॉ.लहाने यांनी आतापर्यंत एक लाख ६२ हजाराहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. हा जागतिक विक्रम आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
