Home आरोग्य तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी झाले नेत्रदान : कडगावात पहिले नेत्रदान

तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी झाले नेत्रदान : कडगावात पहिले नेत्रदान

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : तालुक्यात मोठ्या चिकाटीने सुरू असलेल्या चळवळीत आज सलग दुसऱ्या दिवशी नेत्रदान झाले. कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील पाटील कुटुंबीयांनी लिलावती बसगोंडा पाटील (वय ७४) यांचे मरणोत्तर नेत्रदान केले.

कडगावमधील हे पहिलेच नेत्रदान असून चळवळीतील आकडा ९४ वर पोचला आहे. तालुक्यातील मोठ्या गावात नेत्रदान होऊ लागल्याने चळवळीची व्याप्ती वाढत आहे. गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील मधुकर दत्तात्रय मुळे यांचे मंगळवारी (ता.२२) मरणोत्तर नेत्रदान झाले होते. गिजवणेसारख्या मोठ्या गावातील हे पहिलेच नेत्रदान ठरले. दरम्यान, आज सकाळी लिलावती पाटील यांचे निधन झाले. पाटील कुटुंबीयांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा चळवळीतील कार्यकर्त्यांना कळविली. त्यानंतर येथील अंकुर आय बँकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी कडगाव येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.

दु:खद प्रसंगीही सामाजिक बांधिलकी जपत पाटील कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चळवळीला बळ मिळाले आहे. लिलावती यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी (ता.२५) तिसरा दिवस आहे.

Related Posts

Leave a Comment