गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएनशनतर्फे ३ ते ५ जानेवारी अखेर ‘एमआर –युनायटेड’ ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तेरा वर्षाखालील गटासाठी ही स्पर्धा आहे. साखळी आणि त्यानंतर बाद पध्दतीने एम.आर.हायस्कूलच्या मैदानावर हि स्पर्धा होईल. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.


एम.आर.हायस्कुलने गेल्या शतकभरात क्रीडा क्षेत्रात हजारो खेळाडू घडविले. खासकरून साठ ते ऐंशीच्या दशकात प्रशालने राज्यस्तरावर दबदबा निर्माण केला होता. या प्रशालेच्या क्रीडा पंरपरेचा नव्या पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने हि स्पर्धा प्रशालेच्या शतकमहोत्सावा निमित्त सुरु झाली. खासकरून नवोदित तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याना संधी मिळत नसल्याने हा गट निवडला आहे. स्पर्धेत शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, उपाध्यक्ष सतीश पाटील आणि ‘एमआर’चे प्राचार्य रफिक मुल्ला यांनी केले आहे.

एम.आर.हायस्कुलच्या मैदानावर तीन दिवस हि स्पर्धा होईल. प्रत्येक गटात तीन संघ असणार आहेत. चार गटातील अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र ठरेल. खेळाडूंची शारिरीक क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार लहान करून दोन मैदाने करण्यात येणार आहेत. एकाचवेळी दोन मैदानावर सामने होतील. विजेत्या आणि उपविजेत्या संघासह सहा वैयक्तीक बक्षिसे आहेत. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. रविवारी दुपारी उर्वरित साखळी सामने होतील. सोमवारी सांयकाळी अंतिम सामना होणार आहे. स्पर्धा समन्वयक पार्थ म्हेत्री, सर्वेश मोरे स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.



