गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॅाल स्कूलने मिरजेच्या तिरंगा चषक 15 वर्षाखालील स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात युनायटेड स्कुलला पन्हाळ्याच्या संजीवन स्कुलने नमविले. गडहिंग्लज युनायटेड स्कुलचा खेळाडू ओम चव्हाण याने उत्कृष्ट बचावपटूचा बहुमान मिळविला. मिरजेच्या जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील 12 संघ सहभागी होते.


साखळी पध्दतीने स्पर्धेचा पहिला टप्पा झाला. यात पहिल्या सामन्यात मिरजेच्या जॉन अकादमीचा 2-0 असा पराजय करून विजयी सलामी दिली. युनायटेडचा नवोदित श्रीराज सरदेसाईने पहिला गोल केला. गोलरक्षक वीर पाटीलने फ्रि क्रीकवर उत्कृष्ट गोल करून युनायटेडचा 2-0 असा विजय निश्चित केला. दुस-या सामन्यात युनायटेड स्कुलने सातारा पोलीस बॉईज अकादमीला 1-0 असे नमविले. युनायटेड स्कुलचा प्रणिक घोडकेचा गोल निर्णायक ठरला. युनायटेडने गटात सर्वाधिक गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत गडहिंग्लज युनायटेडने मिरजेच्या एबीपीएस अकादमीचा टायब्रेकरवर 5-4 असा पाडाव केला. निर्धारित वेळेत सामना 0-0 असा बरोबरीत होता. टायब्रेकरमध्ये युनायटेडच्या दर्शन तरवाळ,वीर पाटील,सुमित पन्नोरी, सुरज पवार,श्रीराज सरदेसाई यांनी अचूक गोल केले. अंतिम सामन्यात पन्हाळ्याच्या संजीवन स्कुलने युनायटेड स्कुलला 2-0 असे हरवले.

सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गु सय्यद, विलास देसाई,नरेंद्र देसाई,आसिफ सरवान यांच्याहस्ते विजेते, उपविजेत्यांना गौरविण्यात आले. उपविजेत्या संघाला प्रशिक्षक दिपक कुपन्नावर, संघव्यवस्थापक सागर पोवार यांचे मार्गदर्शन मिळाले. यशाबद्दल युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.


उपविजेता संघ असा…
दर्शन तरवाळ,आकाश पोवार,वीर पाटील,समर्थ पवार,सुरज पोवार, समर्थ शेंडगे,समित पानोरी,सुमित पाटील,ओम चव्हाण,श्रीराज सरदेसाई,उत्कर्ष कांबळे,प्रणित घोडके,परिक्षित निर्मळे,तनिश देसाई,वेदांत राऊत.

