गडहिंग्लज प्रतिनिधी : चौदा वर्षाखालील अंतिम चुरशीच्या फुटबॉल सामन्यात अभिनव स्कूलने शिवराज इंग्लीश मिडियम स्कुलला १-० असे नमवुन विजेतेपदासह प्रतिष्ठेचा डॉ.घाळी करडंक पटकाविला. अभिनव स्कूलचा स्वरुप पाटीलने स्पर्धावीराचा बहुमान मिळविला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम.आर. हायस्कुलच्या मैदानावर गेला महिनाभर डॉ. घाळी शालेय लिग सुरु होती. स्पर्धेचे यंदाचे २६ वे वर्ष आहे.


रंगतदार अंतिम सामन्यात दोन्ही संघानी आक्रमक खेळ करत चेंडू फिरता ठेवला. खासकरून अभिनवने सतत हल्ले करत गोलसाठी प्रयत्न केले. यातून अभिनवच्या केदार जोशीने सामन्याच्या ११ व्या मिनिटाला गोल करत खाते उघडले. गोल फेडण्यासाठी शिवराजने ईर्ष्येने खेळ केल्याने अभिनवच्या गोलरक्षक सात्विक देवार्डे व बचावपटूंना गोलजाळी अभेद्य ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला. उत्तरार्धातही शिवराजच्या समीन मणेर,रणवीर कुराडेचे बरोबरीचे प्रयत्न समन्वयाअभावी वाया गेले. शिवराजचा गोलरक्षक समर्थ शेटकेने उत्कृष्ट गोलरक्षण करून अभिनवचे आघाडी वाढू दिली नाही. शेवटी केदार जोशीचा गोलच्या जोरावर अभिनवने १-० असे विजेतेपद साकारले.

विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव गजेंद्र बंदी,साई एज्युकेशन ग्रुपचे विश्वस्त तुषार पाटील यांच्याहस्ते विजेते आणि उपविजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी युनायटेडचे खजिनदार महादेव पाटील, मुख्याध्यापक ए.बी.पाटील,संजय घाळी,राष्ट्रीय खेळाडू सौरभ पाटील यांच्यासह खेळाडू, पालक आणि क्रीडाशिक्षक उपस्थित होते. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. यावेळी समन्वयक आदर्श दळवी,पवन गुंठे यांचा सत्कार करण्यात आला. ललित शिंदे यांनी आभार मानले. दरम्यान, उपांत्य फेरीत शिवराज स्कुलने जागृती हायस्कूलचा ३-० तर अभिनव स्कूलने वि. दि. शिंदे हायस्लुलला टायब्रेकरवर ३-१ असे हरवून अंतिम फेरी गाठली होती.


सर्वोत्कृष्ट खेळाडू
स्पर्धावीर – स्वरूप पाटील ( अभिनव )
गोलरक्षक – सात्विक देवार्डे ( अभिनव )
बचावपटू – समीर मणेर ( शिवराज )
मध्य़रक्षक- अभिषेक सासने ( वि. दि. शिंदे )
आघाडीपटू- केदार गोरूले ( अभिनव )

