गडहिंग्लज प्रतिनिधी : कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशनतर्फे (केएसए) सुरु असलेल्या गडहिंग्लज ग्रामीण फुटबॉल लिग स्पर्धेत गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने सर्वाधिक नऊ गुणासह विजेतेपद पटकाविले. काळभैरी रोड फुटबॉल क्लबने डॉ.बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्लबला सडनडेथवर नमवुन उपविजेतेपद मिळविले. येथील गडहिंग्लज युनायटेडने संयोजन केलेली हि स्पर्धा एम.आर. हायस्कुलच्या मैदानावर झाली.
सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड अ संघाने ब संघाला १-० असे हरवून विजेतेपद निश्चित केले. सुमित कांबळे याचा गोल निर्णायक ठरला. काळभैरी रोड एफसी विरुध्द डॉ.आंबेडकर क्लब हा दुसरा सामना निर्धारित वेळेत गोलशुन्य बरोबरीत सुटला. टायब्रेकरमध्येही ५-५ अशी बरोबरी कायम राहिली. काळभैरीच्या वैभव ठोंबरे,मधुसदन पावले,रोहन देवार्डे, विशाल भोईटे,मानव रोटे यांनी तर आंबेडकरच्या रविकिरण म्हेत्री,प्रशांत कांबळे,राज घावरे,चैत्यन्य खातेदार, केतन माळगी यांनी गोल मारले. सडनडेथमध्ये आबेंडकरच्या रोहित सलवादेने फटका बाहेर मारला तर काळभैरीच्या विजय होडगेने विजयी गोल करून सहकाऱ्यांना जल्लोषाची संधी दिली.
केएसएचे सचिव माणिक मंडलिक, गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद यांच्या शुभहस्ते विजेत्या आणि उपविजेत्यांना करंडक देऊन गौरविण्यात आले. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहीती दिली. यावेळी केएसए सहसचिव अमर सासने,विश्वास कांबळे,राजेंद्र दळवी,संभाजीराव मांगोरे- पाटील,दिपक घोडके,अर्जून चौगुले,अभिजित चव्हाण,आण्णाप्पा गाडवी यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. यावेळी श्री मंडलिक यांनी आपल्या मनोगतात बाद पध्दतीच्या कोल्हापूरातील सर्वच स्पर्धा संयोजकांना गडहिंग्लजचे संघ घेणे सक्तीचे केले असल्याचे सांगितले.
गडहिंग्लज युनायटेडला सहाव्यांदा विजेतेपद..!
केएसएच्या स्पर्धेचे यंदाचे दहावे वर्ष होते. सुरवातीची सलग पाच वर्षे गडहिंग्लज युनायटेडने विजेतेपद आणि त्यानंतर एकदा उपविजेतेपद मिळविले होते. यंदाच्या स्पर्धेतही सर्वच प्रतिस्पर्ध्यांना सहज हरवून सर्वाधिक ९ गुण मिळविले. प्रतिस्पर्ध्यावर अर्धा डझन गोल मारून एकही गोल स्विकारला नाही. विशेष म्हणजे संघातील बहूतांशी खेळाडू १८ वर्षाखालील आहेत. युवा खेळाडूंनी बहारदार खेळ करून सहावे विजेतेपद पटकाविले.