गडहिंग्लज प्रतिनिधी : रंगतदार अंतिम फुटबॉल सामन्यात दिल्लीच्या सुदेवा एफसीने केरळच्या मुटूथ एफसीला एका गोलने नमवून विजेतेपदासह रोख ७५ हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा युनायटेड करडंक पटकाविला. गोव्याच्या बिदेश इलेव्हनने मंगळूरच्या येनेपोया विदयापीठाला टायब्रेकरवर ४-३ असे हरवून तिसरा क्रमांक मिळविला. दिल्लीच्या इजाझला स्पर्धावीरचा बहूमान मिळाला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत गेले सात दिवस एम.आर. हायस्कूलच्या मैदानावर हि स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचे यंदाचे हे विसावे वर्ष होते.


अंतिम सामन्यात अनुभवी दिल्लीने सुरवातीपासून चेंडूवर ताबा ठेवत केरळच्या गोलक्षेत्रात दबाव वाढविला. दिल्लीच्या आक्रमक पवित्र्यामुळे केरळच्या युवा खेळाडूवर तणाव वाढत जाऊन धावाधाव करावी लागली. सातत्याने चढाया करणा-या दिल्लीच्या आघाडीपटूंना सामन्याच्या एकोणीसाव्या मिनिटाला यश मिळाले. इजाझच्या बगलेतून दिलेल्या क्रॉसपासवर खोंगसाईने हेडव्दारे चेंडू अचूकपणे गोल करून सहका-यांना जल्लोषाची संधी दिली. या गोलमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या दिल्ली संघाने अधिक सुत्रबध्द खेळ करत मध्यतरापर्यंत केरळला परतफेडीची संधी दिली नाही. उत्तरार्धात केरळच्या जानबासने ५४ व्या मिनिटाला फ्रिकिकवर गोलचा केलेला प्रयत्न गोलखांबावरून गेल्याने दिल्लीचे संकट टळले. पाठोपाठ केरळचा मिनलने दिल्लीच्या बचावपटूंना चुकवित गोलक्षेत्रात मुसंडी मारली. पण, दक्ष दिल्लीचा गोलरक्षक लेंजेडने शिताफीने चेंडू बाहेर काढून केरळची सुवर्णसंधी हिरावली. दिल्लीने देखील ७६ आणि ७९ व्या मिनिटाला गोलची आघाडी वाढविण्यासाठी मिळालेली संधी दिशाहिन फटक्यामुळे दवडली. अखेर खोंगसाईच्या निर्णायक गोलच्या जोरावर दिल्लीने केरळला नेस्तानुबत करत विजेतेपदाला गवसणी घातली. गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ, संचालिका अंजना रेडेकर,गोड साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, गजेंद्र बंदी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

उपविजेत्या केरळला रोख ५५ हजार गोव्याला ३० हजार आणि मंगळूरला २० हजारांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी संतोष पाटील,प्रतिक क्षिरसागर,सुभाष बेळगु्द्री,डॉ शैलेश देशपांडे,गुंडू पाटील,युवराज कित्तु्रकर,डॉ.लक्ष्मण चौगुले,महेश सलवादे,नवाब मालदार,संभाजी शिवारे,मल्लिकार्जून बेल्लद,अरविंद बार्देस्कर,समीर राऊत,विनोद चौगुले यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. स्पर्धा संयोजक दिपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले.दरम्यान तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत गोव्याने मंगळूरला टायब्रेकरवर ४-३ अशी मात करत सुखद समारोप केला. पंधरा वर्षाखालील मैत्रीपु्र्ण सामन्यात युनायटेड स्कुलने बेळगावच्या रेग एफसीला ३-० असे हरविले.


स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ
गोलरक्षक – लेंजड ( दिल्ली)
बचावपटू – जाहिद ( दिल्ली)
मध्यरक्षक – ऋतुराज ( दिल्ली)
आघाडीपटू – खोंगसाई ( दिल्लीः
उद्योन्मुख- अपहप ( केरळ)
स्पर्धा वीर- इजाझ ( दिल्ली)

शौकीनांची गर्दी
संपुर्ण स्पर्धेत दिल्ली आणि केरळने चौफेर खेळाचे प्रदर्शन केल्याने अंतिम सामना पाहण्यासाठी एम.आर. हायस्कुलच्या मैदानाला जणू शौकीनांच्या महापूर आला होता. मैदानात सायंकाळी चार पुर्वीच हाऊसफुल्ल झाले. मैदाना सभोवती पाय ठेवायलाही जागा नव्हती. मैदानाला जोडणा-या सर्वच रस्त्यावर वाहनांरच्या रांगा लागल्या होत्या. दिल्लीच्या गोलची केरळ परतफेड करेल या आशेने शौकीन मुख्य पंचाच्या शेवटच्या शिटीपर्यंत मैदानावर थांबून होते. पण, दिल्लीच्या चिवट बचावापुढे केरळची डाळ न शिजल्याने अनेकांची निराशा झाली.
