गडहिंग्लज प्रतिनिधी : य़ेथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवासून(ता.१५)माजी आमदार आणि खेळाडू डॉ.एस.एस.घाळी यांच्या स्मरणार्थ शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. चौदा आणि सतरा वर्षाखालील गटात होणारी ही स्पर्धा साखळी (लीग) पध्दतीने होणार आहे. दर शनिवार आणि रविवारी दुपारच्या सत्रात एम.आर. हायस्कुलच्या मैदानावर हे सामने होतील. पहिल्या ठप्यात सतरा आणि दुसऱ्यात चौदा वर्षाखालील स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे यंदाचे सव्वीसावे वर्ष आहे.


गडहिंग्लज युनायटेड मार्फत स्थानिक शालेय फुटबॉलपटूंना सामने खेळण्याचा अधिक अनुभव मिळावा यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. माजी आमदार आणि खेळाडू डॉ घाळी यांचा स्थानिक फुटबॉलला क्षेत्राला मोठे पाठबळ होते. दिवाळी फुटबॉल स्पर्धेला मदतीसह गडहिंग्लजच्या संघाना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला होता. शालेय वयातच खेळाडूंना अधिक संधी मिळावी ही संकल्पना आहे. शहर परिसरासह लगतच्या ग्रामीण भागातील शाळांनाही स्पर्धेसाठी निंमत्रित करण्यात आले आहे.

दोन्ही विभागातील सहभागी संघाची दोन गटात विभागणी करण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सतरा गटाची स्पर्धा ११ ए साईड तर चौदाची नाईन साईड पध्दतीने होईल. स्पर्धेसाठी शालेय खेळाडूंची क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार कमी करण्यात आला आहे. पहिल्या ठप्पात सतरा वर्षे गटाच्या स्पर्धा होतील. त्यानंतर चौदाच्या स्पर्धा आहेत. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाला प्रतिष्ठेचा डॉ. घाळी करंडकासह क्रीडा साहित्य दिले जाणार आहे. शनिवारी दुपारी १ वाजता स्पर्धेचे उदघाटन होणार असल्याचे युनायटेडचे अध्य़क्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी माहीती दिली. समन्वयक आदर्श दळवी,पवन गुंठे आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.


बदलेले स्वरूप कायम
स्पर्धेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्य गत वर्षापासून सतरा वर्षे गटाचे स्वरुप बदलण्यात आले होते. स्थानिक अव्वल चार संघाना लगतच्या बेळगाव,कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ठ संघाविरूध्द खेळण्याची संधी दिली होती. परगावच्या संघाविरुद्ध लढल्याने खेळातील उणीवा लक्षात घेऊन त्यात सुधारणा कराव्यात हिच हाच यामागील उद्देश आहे. हे बदलेले स्वरुप यंदापासून कायम ठेवण्यात येणार आहे.

