गडहिंग्लज प्रतिनिधी : स्व.माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन,कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळा २०२५ शाहू स्मारक भवन,कोल्हापूर येथे संपन्न झाला. भादवण हायस्कूल,भादवणचे सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना वीस वर्षांच्या सेवेतील शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक, साहित्य,कला,क्रीडा अशा अष्टपैलू कार्याची नोंद घेऊन राज्यस्तरीय माणिक शिक्षण सेवा गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी अधिविभाग प्रमुख डॉ.रणधीर शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,कोल्हापूर विभागाचे सहसचिव डी.एस.पोवार उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील साहित्य, कला,क्रीडा,कृषी,शिक्षण,आरोग्य, गिर्यारोहण,अवयवदान,सामाजिक संस्था अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४५ गुणवंत मान्यवरांना “आदर्श पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. यावेळी मनोगतामध्ये डॉ.रणधीर शिंदे यांनी समाजाला प्रोत्साहनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर डी.एस.पवार यांनी समाजातील गुणवंत व्यक्तींना प्रोत्साहन देऊन प्रेरणा देणाऱ्या फाउंडेशनचे कौतुक केले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या वतीने प्रशांत गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. समाजातील विविध घटकातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर या पुरस्काराच्या रूपाने कौतुकाची थाप दिल्याने पुढील काळात यापेक्षाही चांगले कार्य करण्याची जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.