गडहिंग्लज प्रतिनिधी : येथे दिवाळी सुट्टीत २४ ते ३० आक्टोंबर अखेर होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी गतीने सुरु आहे. गेल्या चार दिवसापासून फुटबॉलपटू श्रमदानातून एम.आर.हायस्कुल मैदानावरील गवत काढण्यासह माती टाकून दुरूस्ती करत आहेत. लोकवर्गणीचे संकलन सुरु असून परगावच्या विविध संघाशी संपर्क साधला जात आहे. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत होणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे विसावे वर्ष आहे. याठिकाणी दिवाळीतील फुटबॉल स्पर्धांची अर्ध दशकांची परंपरा आहे. अजित क्रीडा मंडळाने सत्तरच्या दशकात सुरु केलेली हि परंपरा गडहिंग्लज युनायटेडने लोकवर्गनीतून चिकाटीने जपली आहे.
यंदाच्या स्पर्धेला दिल्लीचे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ),मुंबईचे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आणि कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने परवानगी दिली आहे. स्पर्धेसाठी मैदानाची तयारी गतीने सुरु आहे. रोज सायंकाळी खेळाडूंनी श्रमदानातून मैदानावरील गवताची कापणी पुर्ण केली आहे. मैदाना बाहेरील गवताची कापणी सध्या सुरु आहे. यावर्षीच्या अधिकच्या पाऊसामुळे मैदानावरील माती जास्त वाहून गेल्याने पडलेले खड्डे भर टाकून भरून घेतले जात आहेत.
स्पर्धेसाठी लोकवर्गणीतून निधीचे संकलनही सुरू आहे. दररोज खेळाडू क्रीडा प्रेमी दानशुर नागरिकांना भेटून मदतीसाठी आवाहन करत आहेत. निवास,भोजन,मंडप आदींचे नियोजन सुरु आहे. स्पर्धेत गोवा,केरळ,कर्नाटक,महाराष्ट्र,दिल्ली येथील संघाना सहभागासाठी आंमत्रण दिले गेले आहे. स्पर्धेसाठी एकुण अडीच लाख रुपयांची पारितोषिके आहेत. प्रत्येक सामन्यातील विजयी संघातील उत्कृष्ट खेळाडूला सामनावीर तर पराभूत संघातील खेळाडूला लढवय्या म्हणून गौरविण्यात येणार आहे. सहभागी संघाची प्रवास खर्च आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, उपाध्यक्ष सतीश पाटील,समन्वयक सुभाष पाटील,ओमकार जाधव यांच्यासह संचालक, खेळाडू स्पर्धेची तयारी करीत आहेत.
सहभागासाठी देशभरातून संघ इच्छुक ग्रामीण भागात सोयी-सुविधांचा अभाव असतानाही युनायटेड करडंक स्पर्धेने सातत्य टिकवित शिस्तबद्ध पणाजपला आहे. त्यामुळेच भारतीय फुटबॉलमधील अव्वल समजल्या जाणाऱ्या इंडियन लीग खेळणाऱ्या नामवंत गोवा,केरळ,बंगळूर,मुंबईच्या संघानी आवर्जून हजेरी लावत विजेतेपद पटकाविले. खासकरून गडहिंग्लजकरांची मोठी गर्दी आणि दर्जेदार स्पर्धेचे संयोजन यामुळे यंदा छत्तीसगड,मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश,मणिपूर,बंगाल या राज्यातून अनेक संघानी स्पर्धेसाठी ई मेलने अर्ज पाठवले. परंतु दिवाळी सुट्टीतील मैदानाची मर्यादित उपलब्धता आणि खर्चिक बाबीमुळे मोजक्या नामवंत १६ संघानाच प्रवेश दिला आहे.