गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे,माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व माजी नगरसेवक उदय पाटील यांनी आज सायंकाळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे अजितदादा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर प्रवेश केला. तसेच यावेळी मौजे करंबळी(ता-गडहिंग्लज)चे लोकनियुक्त सरपंच अनुप पाटील,अँड.सतिश इटी,विनोद बिलावर यांनीही यावेळी राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतिश पाटील,गोडसाखर संचालक भाई पताडे उपस्थित होते.
बसवराज खणगावे,नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील यांच्या प्रवेशामुळे गडहिंग्लजच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे तर मंत्री हसन मुश्रीफ यांना विधानसभा लोकसभा निवडणुकीत फायद्याचे ठरणार आहे. तसेच आगामी नगरपालिका निवडणूकित खणगावे,भद्रापूर,पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीसाठी बेरजेचे राजकारण होणार आहे. तर जनता दलाचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते निघून घेल्याने जनता दलासाठी हा मोठा धक्का मानला जातो.
गेल्या काही दिवसापासून जनता दलाचे काही माजी नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती… त्या चर्चेला आज झालेल्या प्रवेशामुळे पूर्णविराम मिळाला असून प्रवेशानंतर आम्ही खणगावे,भद्रापूर व पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी गडहिंग्लजच्या विकासासाठी प्रवेश केलेचे सांगितले.