Home आरोग्य नेत्रदान चळवळीचा शनिवारी वर्धापनदिन;पूजा कदम प्रमुख पाहुण्या : नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना होणार गौरवपत्राचे वितरण

नेत्रदान चळवळीचा शनिवारी वर्धापनदिन;पूजा कदम प्रमुख पाहुण्या : नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना होणार गौरवपत्राचे वितरण

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज व आजरा तालुक्यात रुजलेल्या मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा अकरावा वर्धापनदिन शनिवारी (ता.१३) होणार आहे. येथील कचेरी मार्गावरील बचत भवनमध्ये सकाळी साडेनऊला हा कार्यक्रम होईल. केंद्रीय जीएसटी विभागाच्या सहायक आयुक्त पूजा कदम (आयआरएस) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र प्रदान केले जाणार आहे.

अत्याळ (ता. गडहिंग्लज) या गावात २०१२ मध्ये मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा प्रारंभ झाला. वर्षागणिक चळवळीचा परिघ विस्तारत आहे. आतापर्यंत गडहिंग्लज शहरासह चौदा गावातून ९६ व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. तसेच येथील अंकूर आय हॉस्पिटलमध्ये आय बँक सुरु आहे. या ठिकाणी अंधांवर नेत्र प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तर नेत्र प्रत्यारोपणातूनही दृष्टी देता येत नाही अशा अंधांसाठी पाच महिन्यापूर्वी रोजगार केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणी अंधांकडून एलईडी बल्ब व लायटींग माळांची निर्मिती केली जात आहे.दरम्यान, वर्धापनदिन कार्यक्रमात रत्नाबाई पालकर,आणाप्पा मोहिते,आऊबाई कुंभार,चंद्रकांत जाधव (ऐनापूर), विमल पोवार,शेवंता भुईंबर,इंदुबाई पाटील (कौलगे),महादेव शिंदे,सतीश चोरगे (अत्याळ), कलाप्पा बंदी (भडगाव),सुमन यमगेकर (उत्तूर), लिलावती पाटील (कडगाव),मधुकर मुळे (गिजवणे),शामराव चाळक (शिप्पूर तर्फ आजरा),सोनाबाई पन्हाळकर (करंबळी) या नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना पूजा कदम यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान केले जाणार आहे. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अंधत्व, तरीही ‘युपीएससी’त यश…

वर्धापनदिनाच्या प्रमुख पाहुण्या पूजा कदम २०२० च्या बॅचच्या आयआरएस अधिकारी आहेत. त्या मूळच्या टाका (जि. लातूर) येथील आहेत. केवळ १५ टक्के दृष्टी असतानाही त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत ५७७ वा क्रमांक पटकाविला. अंधत्वामुळे खचून न जाता जिद्दीने त्यांनी हे यश मिळविले. त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

Related Posts

Leave a Comment