गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील शिवराज महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त माजी विद्यार्थी शिक्षक नंदकुमार येसादे,विलास माळी (करंबळी),विलास पाटणे(ऐनापूर), एल.बी.बारदेस्कर,एफ.एस.रॉड्रीक्स (गडहिंग्लज),कमल पाटील (आर्दाळ) आदी शिक्षकांचा शाल,ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे व संचालिका प्रा.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे मार्गदर्शन करताना म्हणाले की आज शिक्षक दिनानिमित्त शिवराज महाविद्यालयात घडलेले एकेकाळचे माजी विद्यार्थी यांनी शिक्षणक्षेत्रात दिलेले मोलाचे योगदान आम्हाला आदर्शवत आहे. या आदर्शवत कार्याचा सन्मान व्हावा आणि नव्या पिढीला त्यांचा कार्याचा परिचय व्हावा तसेच शिवराजशी आजपर्यंत जपलेला ऋणानुबंध व स्नेह अधिक वृद्धींगत व्हावा यासाठी अशा गुरुजनांचा सन्मान करीत आहोत. याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे स्पष्ट करून समाजाभिन्मुख विद्यार्थी घडला पाहिजे. यासाठी शिक्षकांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. मात्र आज शिक्षकांच्या विषयी आदर कमी होत आहे याबाबत विचार होणे काळाची गरज आहे.
यावेळी सत्कारमूर्ती शिक्षक नंदकुमार येसादे, विलास माळी यांनी आम्ही शिवराजमध्ये खऱ्याअर्थी घडलो आहे. शिवराज हे बहुजनांचे कॉलेज आहे. कॉलेजमध्ये समाजातील तळागाळातील विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले जाते. शिवराजचा आदर्श आजही आमच्या कार्यात जपलेला आहे असे स्पष्ट केले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास डी.एम.पाटील, यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तानाजी भांदुगरे, प्रा.श्रीदेवी साखरे यांनी केले तर आभार प्रा.आर.एस.पाटील यांनी मानले.