गडहिंग्लज प्रतिनिधी : इंडियन सुपर लीग (आएएसएल),इंडियन लीग (आय लीग) या व्यावसायिक फुटबॉल संघाच्या धर्तीवर युनायटेडमार्फत डेव्हलपमेंन्ट संघ संकल्पना राबवली जाते आहे. तेरा,पंधरा आणि अठरा वर्षाखालील प्रतिभावान खेळाडूंना निवडून त्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण,उत्कृष्ठ किट आणि अधिकाधिक चांगल्या स्पर्धां खेळण्याची संधी दिली जाते आहे. त्याचा नवोदित फुटबॉलपटूंनी फायदा उठवावा असे आवाहन गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी केले.
येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे डेव्हलपमेंन्ट संघातील नवोदित खेळाडूंना किट वाटप कार्यक्रमात बोलत होते. जेष्ठ खेळाडू महादेव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ओमकार जाधव यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात डेव्हलपमेंन्ट संघातून युनायटेडने नवोदितांना बळ दिल्याने येथील खेळाडू गोवा, बंगळूरला निवडले गेल्याचे सांगितले. यावेळी पंधरा,तेरा वर्षाखालील खेळाडूंना किट आणि बुट आदी क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्री.कोळकी म्हणाले, केवळ स्पर्धा न भरवता खेळाडू घडले पाहिजेत या उद्देशाने गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल काम करत आहे. त्यातून चांगले निकाल येत आहेत. पुर्वीच्या तुलनेत खेळाडूंना अधिक सुविधा मिळत असल्याने नवोदितांनी याचा फायदा उठवावा. यावेळी युनायटेडचे संचालक प्रशांत दड्डीकर,आर्यन दळवी, दत्ता चव्हाण यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. सौरभ जाधव यांनी आभार मानले.