गडहिंग्लज प्रतिनिधी : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शाश्वत विकासासाठी मूल्यमापन ते प्रगती अभियान राबविले जाणार आहे. शिदोरी उपक्रमांतर्गत रविवारपासून (ता.२१) तीन महिने हे अभियान चालणार आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आठ मानसशास्त्रीय चाचण्या आणि त्यानुसार समुपदेशन केले जाणार आहे. गडहिंग्लज उपविभागात गावपातळीवर अशा प्रकारचे अभियान प्रथमच राबवले जात आहे.
अत्याळ येथे उत्सव नात्यांचा या संकल्पनेवर आधारित नुकताच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात विद्यार्थ्यांसाठी मनाच्या संकल्पनेवर आधारित दोन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याचा पुढचा टप्पा म्हणून व्यक्तिमत्व विकास मूल्यमापन ते प्रगती हे अभियान राबविले जाणार आहे. मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जाणार आहे.
या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या परिणामकारक अभ्यास कौशल्य विकसित करणे,ताण व्यवस्थापन,स्व जाणीव,टाइम मॅनेजमेंट व ध्येय निश्चिती,शालेय समायोजन, अभ्यासातील चालढकल कमी करणे, भावनिक नात्यातील सजगता, सामाजिक सक्षमता या मानसशास्त्रीय चाचण्या होणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या रविवारी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत या चाचण्या होणार आहेत. प्रत्येक चाचणीनंतर विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. तसेच पालकांचे दोन वेळा समुपदेशन होणार आहे. तसेच सर्व चाचण्या संपल्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा त्याच चाचण्या करून विद्यार्थ्यांमधील प्रगतीचा आलेख तपासला जाणार आहे.