गडहिंग्लज प्रतिनिधी : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातग्रस्त गंभीर जखमीला तातडीची मदत केली. रात्री साडेनऊच्या सुमाराला गडहिंग्लज शहराजवळ श्री. काळभैरी मंदिराजवळ झालेल्या अपघातात बेशुद्ध रुग्णाला त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पोहोचविले.
याबाबत अधिक माहिती अशी, रात्री साडेनऊ वाजता गडहिंग्लजवरून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम आटोपून पालकमंत्री श्री. मुश्रीफ कागलकडे चालले होते. श्री. काळभैरी देवालयासमोर अज्ञात वाहनाने स्कूटरला ठोकरले होते. त्यामध्ये डोकीला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झालेला स्कूटरस्वार( नाव समजू शकले नाही) रस्त्यातच रक्तबंबाळ व बेशुद्धावस्थेत पडलेला होता. ॲक्सेस कंपनीची स्कूटर क्रमांक एम. एच. ०९-ई.एफ. १५४९ बाजूच्या गटारीमध्ये पलटी होऊन पडली होती. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी रस्त्यातच थांबत खाली उतरून सोबतच्या अंगरक्षकांना पोलीस यंत्रणेला आणि ॲम्बुलन्सला तातडीने फोन करण्याच्या सूचना दिल्या. अवघ्या १० ते १५ मिनिटांतच ॲम्बुलन्स येऊन जखमीला उपचारासाठी गडहिंग्लजला घेऊन गेली.