गडहिंग्लज प्रतिनिधी : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील निवृत्ती कृष्णा मोहिते (वय ८२) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. गडहिंग्लज व आजरा तालुक्यात गेल्या बारा वर्षांपासून अविरतपणे सुरु असलेल्या चळवळीतील हे शंभरावे नेत्रदान ठरले. तर चळवळीचा प्रारंभ झालेल्या अत्याळ गावातील हे ३४ वे नेत्रदान आहे.
निवृत्ती मोहिते यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी आठच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी चळवळीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर येथील अंकूर आय बँकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने अत्याळ येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. निवृत्ती मोहिते यांच्या मागे तीन मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी (ता.२२) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.
दरम्यान, मरणोत्तर नेत्रदान चळवळीची २०१२ साली अत्याळ येथून सुरवात झाली. आतापर्यंत अत्याळ (३४), बेळगुंदी (१३), ऐनापूर (११), कौलगे (७), गडहिंग्लज शहर (६), भडगाव (५), करंबळी (४), सरोळी व नूल (प्रत्येकी ३), शिप्पूर तर्फ आजरा व उत्तूर (प्रत्येकी २), शेंडूर, बामणे, उंबरवाडी, हिरलगे, लिंगनूर कसबा नूल, बामणे, इंचनाळ, गिजवणे, कडगाव, हंदेवाडी (प्रत्येकी १) या गावातील व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे.