Home राजकीय आ.सतेज पाटलांवर गुन्हा दाखल करा – अमल महाडिक

आ.सतेज पाटलांवर गुन्हा दाखल करा – अमल महाडिक

by Nitin More

कोल्हापूर प्रतिनिधी : नेहमी शांत संयमी भूमिका घेणारे माजी आमदार अमल महाडिक यांनी काल कार्यकारी संचालकांना झालेल्या भूमिकेवर अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. थेट सतेज पाटलांवर गुन्हा दाखल करा, कॉल रेकॉर्डिंग तपासा अशी मागणी आज अमल महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत केली. शेतकर्‍यांना पुढं करून गुंडगिरी करत दहशत पसरवण्याचा आमदार सतेज पाटील यांचा प्रयत्न आहे असा आरोपही छत्रपती राजाराम कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकर्‍यांसाठी अनेक आक्रमक आंदोलनं केली. पण माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही कारखान्याच्या कर्मचार्‍याला मारहाण केली नाही. मात्र शेतकर्‍यांना पुढं करून आमदार सतेज पाटील गुंडगिरी करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी केला. पोलीस प्रशासनानं सतेज पाटील यांची दादागिरी मोडून काढावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा कॉल रेकॉर्ड तपासावे अशी मागणी करत अमल महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेतली.

पत्रकार परिषदेनंतर कारखान्याच्या कर्मचार्‍यांचं संरक्षण करावं या मागणीचं निवेदन संचालक मंडळाच्या व कर्मचाऱ्यांच्यावतीनं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आलं.

कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना आमदार सतेज पाटील समर्थक संदीप नेजदार आणि त्यांच्या गुंडांनी मंगळवारी बेदम मारहाण केली. शिवाय साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून, राजाराम कारखान्याच्या ऊस तोडणी पाळीपत्रकावर आरोप केले.

आज कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक आणि संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन, सतेज पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. सतेज पाटील यांनी संदीप नेजदार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन, राजाराम कारखान्याचे एमडी प्रकाश चिटणीस यांच्यावर हल्ला घडवून आणला.

सतेज पाटील यांनी ऊस तोडणी पाळीपत्रकावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. संदीप नेजदार यांचा १७८ टन ऊस आतापर्यंत कारखान्याला गेला आहे. त्यांचे बिलसुध्दा नेजदार यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे. डी.वाय. पाटील यांचा २० टन, संजय डी. पाटील यांचा ५६ टन, सतेज पाटील यांचा १० टन ऊस आतापर्यंत राजाराम कारखान्यानं गाळप केला आहे. सतेज पाटील यांच्या मोर्चात सहभागी असणार्‍या प्रशांत नायकू पाटील,सुनंदा चौगुले,प्रताप घाटगे,मिलिंद बाळकृष्ण पाटील,प्रदीप घाटगे,अमरसिंह पाटील यांच्यासह अन्य शेतकर्‍यांच्या उसाची तोडणी केल्याची यादीच महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कसबा बावड्यातील ८०७ शेतकर्‍यांच्या नोंदी झाल्या असून त्यापैकी ४२२ शेतकर्‍यांच्या उसाला तोडणी दिले. त्याशिवाय २०० बिगर सभासदांचा ऊस कारखान्याला आला आहे. यावर्षी ऊस गळीत हंगाम १५ दिवस उशीरा सुरु झाला. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत आजपर्यंत कसबा बावड्यातील १ हजार टन उसाचं जादा गाळप झाल्याचं अमल महाडिक यांनी सांगितलं.

राजाराम कारखान्याची ऊस नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे नोंदणी करुन घेतली नाही हा दावा सपशेल खोटा आहे. खोटं बोल पण रेटून बोल, ही सतेज पाटील यांची जुनीच पध्दत आहे. शेतकर्‍यांच्या आडून राजाराम कारखान्याला बदनाम करण्याचा आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न सतेज पाटील करत आहेत, असा घणाघाती आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी केला.

घडलेल्या प्रकरणाची पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेऊन, कर्मचार्‍यांमधील असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी योग्य कारवाई करावी,अशी मागणी अमल महाडिक यांनी केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नारायण चव्हाण,सत्यजित कदम,संचालक दिलीप पाटील, तानाजी पाटील,मारुती किडगावकर, शिवाजी पाटील,दिलीप उलपे, विलास जाधव,संतोष पाटील,संजय मगदूम,सर्जेराव पाटील,नंदकुमार भोपळे उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment