Home आरोग्य दृष्टीहीन शिकणार आता वाचायला!अत्याळला कार्यशाळा : गणेशोत्सवानिमित्त केले आहे आयोजन

दृष्टीहीन शिकणार आता वाचायला!अत्याळला कार्यशाळा : गणेशोत्सवानिमित्त केले आहे आयोजन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. पण, दृष्टीच नसल्याने कित्येकांना बाराखडीही गिरवता आलेली नाही. तर अनेकांची आयुष्याच्या मध्यावरच दृष्टी गेल्याने लिहिणे-वाचणे थांबले आहे. अशा दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपी कार्यशाळा होणार आहे. अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे गणेशोत्सवानिमित्त या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत लक्ष्मी देवालयात ही कार्यशाळा होणार आहे. नेत्रदान चळवळीमार्फत गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील दृष्टीहीनांसाठी तीन स्वतंत्र स्वयंसिद्धता कार्यशाळा घेतल्या होत्या. त्यानंतर आठ दिवसांची निवासी रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा झाली होती. यात एलईडी बल्ब, माळा तयार करण्यास शिकलेल्या दृष्टीहीनांसाठी दोन महिन्यापूर्वी येथील कचेरी मार्गावर रोजगार केंद्र सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, आता गणेशोत्सवानिमित्त दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपी कार्यशाळा होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत चालणाऱ्या कार्यशाळेत दृष्टीहीनांना ब्रेल लिपी शिकविली जाणार आहे. ब्रेलच्या माध्यमातून त्यांना किमान वाचता यावे. वाचनातून विरंगुळा मिळावा, हा यामागील उद्देश आहे. ब्रेल मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असणारे स्वागत थोरात (मुंबई) व स्वरुपा देशपांडे (पुणे) मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होणारे दृष्टीहीन व त्यांच्यासोबत येणारे नातेवाईक यांच्यासाठी दुपारी जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. दृष्टीहीनांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

त्या दृष्टीहीनांना आणखी एक संधी…

यापूर्वीच्या स्वयंसिद्धता कार्यशाळांत विविध कारणांनी सहभागी होऊ न शकलेल्या दृष्टीहीनांना आणखी एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. २६ व २७ सप्टेंबरला स्वयंसिद्धता कार्यशाळा होणार आहे. दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही कार्यशाळा होईल. तसेच २५ सप्टेंबरला दृष्टीहीन कलाकारांचा गीत बहार हा संगीत कार्यक्रम होईल. तर २६ सप्टेंबरला दृष्टीहीनांचा प्रतिकुलतेतून अनकुलतेकडे जाणाऱ्या प्रवासावर अधारित ‘चला डोळस होऊ या’ हा कार्यक्रम होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम सायंकाळी साडेसातला होतील.

Related Posts

Leave a Comment