Home राजकीय आजरा कारखाना वाचवूनच दाखवू : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

आजरा कारखाना वाचवूनच दाखवू : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : प्रचंड आर्थिक संकटात असलेला आजरा सहकारी साखर कारखाना वाचला तरच शेतकऱ्यांना न्याय आणि कामगारांचे कल्याण होईल. श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीला बहुमताने सत्ता दिल्यास कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना वाचवूनच दाखवू अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कानोली (ता. आजरा) येथे श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार के.पी. पाटील होते.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आजरा कारखान्याची या घडीची मालमत्तेसह किंमत १०५ कोटी रुपये आहे आणि कर्ज मात्र दीडशे कोटींच्या पुढे गेले आहे. हा कारखाना सावरायचा असेल तर सहवीज प्रकल्प आणि डिस्टिलरी उभी करावी लागेल. यासाठी या परिसराची फार मोठी अडचण आहे ती इको- सेंसीटीव्ह झोनची. ही बंदी उठविण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा यांना भेटू. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा कारखाना कर्जमुक्त होईल आणि खऱ्या अर्थाने शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळेल.

आमदार राजेश पाटील म्हणाले, सहकारात चांगले काम करणाऱ्यांना ओळखा आणि श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या पाठीशी राहा. आजरा साखर कारखान्याचे सहकाराचे श्रममंदिर सक्षम नेतृत्वाच्या हातात द्या.

आजरा स्वयंपूर्ण होईल……!

आमदार श्री पाटील म्हणाले, कर्जबाजारीपणामुळे एनपीएमध्ये गेलेला आजरा साखर कारखाना पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी मोठ्या पराकष्ठेने बाहेर काढला. आज विरोधक त्यांच्यावरच नको त्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्या नेतृत्वाखालीच आजरा स्वयंपूर्ण होईल.

व्यासपीठावर माजी आमदार के.पी. पाटील,केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह कुपेकर,दिगंबर देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment