गडहिंग्लज प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदारसंघात सर्वसमावेशक विकासकामांसाठी निधी व शासनाच्या योजना गट-तट न पाहता राबवित आहोत. गडहिंग्लज विभागातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
कडगाव(ता.गडहिंग्लज) येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी घाटगे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ज्योतिबा देवालायजवळील ओढ्यावरील व कुर्लेकर वसाहती जवळील जुना गारगोटी रस्त्यावरील पूल अशा दीड कोटी रुपयांच्या दोन पुलांचा, श्री.रेणुका मंदिर परिसर काँक्रिटीकरण व अंगणवाडी दुरुस्ती अशा पावणे दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रावसाहेब पाटील-कुर्लेकर होते.
यावेळी श्री. घाटगे म्हणाले की गडहिंग्लज-उत्तूर-आजरा उपविभागावर विकासकामांसाठी निधी देताना विद्यमान लोकप्रतिनिधींनी अन्याय केल्याची भावना कार्यकर्ते सातत्याने व्यक्त करतात. विकासकामांचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण कागल विभागापेक्षाही या विभागासाठी जादा निधी उपलब्ध करून दिला आहे. निधी देताना प्राथमिक आरोग्य केंद्र,प्राथमिक शाळा,अंगणवाडी,रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी योजना यांना प्राधान्य दिले आहे.यापुढेही आणखी निधी उपलब्ध करून देऊ.
पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील म्हणाले, भाजपच्या माध्यमातून समरजितसिंह घाटगे यांनी गतवर्षी पिण्याच्या पाण्यासाठीची साडेआठ कोटी रुपयांची योजना मंजूर केली, तर आता पावणेदोन कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला आहे. कोणतेही संविधानिक पद नसताना सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या समरजितसिंह घाटगेंना आमदार म्हणून निवडून देऊया.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे,तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संजय बटकडली,अनंत कुलकर्णी,संग्रामसिंह घाटगे, करंबळीचे सरपंच अनुप पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी स्वागत अजित जामदार यांनी केले. शहाजी पाटील यांनी आभार मानले.
परिवर्तन अटळ…!
समरजितसिंह घाटगे यांचा गट-तट न पाहता सर्वसमावेशक कामाचा धडाका पाहता विधानसभेच्या निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.या परिवर्तनात कागलकरांच्या पुढे आजरा-गडहिंग्लजकर असतील.असा विश्वास जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी व्यक्त केला.