गडहिंग्लज प्रतिनिधी : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सतीश ईश्वर चोरगे (वय ३५) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. अत्याळ गावातील हे ३३ वे तर चळवळीतील ९५ वे नेत्रदान ठरले. चळवळीत गेल्या पंधरा दिवसात तीन व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे.
सतीश चोरगे आज सकाळी आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गडहिंग्लजला आले होते. तिला शाळेत पाठवून जाताना भडगाव रोडवर त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. पण, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. गावातील कार्यकर्त्यांनी सतीशच्या नातेवाईकांशी नेत्रदानाबाबत चर्चा केली. सतीशच्या मृत्यूचा मोठा मानसिक धक्का बसलेला असतानाही त्यातून सावरत आई-वडील, पत्नीने नेत्रदानास संमती दिली. त्यानंतर येथील अंकूर आय हॉस्पिटलच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. सतीशच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.