गडहिंग्लज प्रतिनिधी : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील महारुद्ध शिवाप्पा शिंत्रे (वय-८१) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. भडगावातील हे पाचवे तर गडहिंग्लज व आजरा तालुक्यात सुरु असलेल्या चळवळीतील हे ९९ वे नेत्रदान ठरले.
महारुद्ध यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची नूल (ता. गडहिंग्लज) येथील मेव्हणी अन्नपुर्णा खानापूरे व साडू प्रकाश खानापुरे यांचे यापूर्वी मरणोत्तर नेत्रदान झालेले आहे. त्यामुळे शिंत्रे कुटुंबीयांना चळवळीची माहिती होती. त्यांनी महारुद्ध यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. गावातील कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी येथील अंकूर आय बँकेशी संपर्क साधला. आय बँकेच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.
महारुद्ध कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून निरीक्षक पदावरुन निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे मुलगा,चार मुली,सून,जावई,नातवंडे असा परिवार आहे.