गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि श्री रावसाहेब कित्तुरकर विश्वस्त मंडळातर्फे उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिर होणार आहे. एम.आर.हायस्कुलच्या मैदानावर शुक्रवारपासून (ता.१९) दहा दिवसांच हे शिबिर होईल. आठ ते सोळा वर्षाखालील खेळाडूंसाठी हे शिबिर मोफत असणार आहे. रोज सायंकाळी पाच ते साडे सहा या वेळेत हे शिबिर आहे. शिबिरात खेळाडूंसाठी विविध व्याख्यानेही होणार आहेत. शिबिराचे यंदाचे २५ वे वर्ष आहे.
स्थानिक नवोदित खेळाडूंना फुटबॉलची ओळख व्हावी या उद्देशाने गडहिंग्लज युनायटेडमार्फत दरवर्षी हे शिबिर घेतले जाते. अलीकडे मोबाईलमुळे विद्यार्थी मैदानापासून दुरावत आहेत. त्या विद्यार्थ्यांना फुटबॉलच्या माध्यमातून मैदानी खेळाची गोडी लागावी हाच शिबिराचा मुख्य हेतू आहे. रोज सायंकाळच्या सत्रात हे शिबिर होईल. शिबिरात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) ‘डी लायन्स’ धारक पाच प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. फुटबॉलची विविध कौशल्ये शिकविली जाणार आहेत. विशेषतः गोलरक्षकासाठी खास प्रशिक्षण दिले जाईल.
शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी खेळाडूंचा आहार,स्पोटर्स करियर, दुखापतीवरील उपचार या विषयावर खास तज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. शिबिरातील प्रतिभावान होतकरू विद्यार्थ्यांना युनायटेड फुटबॉल स्कुलसाठी निवडले जाईल. शिबिराच्या शेवटच्या ठप्प्यात सहभागी खेळाडूसाठी स्पर्धा होईल. उत्कृष्ट शिबिरार्थींना क्रीडासाहित्य देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मलिकार्जून बेल्लद, उपाध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी आणि कित्तरकर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संतोष कित्तूरकर यांनी केले आहे. शिबिर समन्वयक सुल्तान शेख,सागर पोवार नियोजन करत आहेत.