गडहिंग्लज प्रतिनिधी : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील शामराव रामू गाडीवड्ड (वय-७८) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. अत्याळ गावातील हे ३६ वे नेत्रदान आहे. चळवळीत त्यांच्या पत्नीचेही सहा वर्षांपूर्वी नेत्रदान झाले आहे. चळवळीत पती-पत्नीचे नेत्रदान होण्याची घटना तिसऱ्यांदा घडली आहे.
शामराव गाडीवड्ड गेल्या काही दिवसांपासून पक्षाघातामुळे आजारी होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले. नातेवाईकांच्या संमतीनंतर येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने अत्याळ येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
शामराव गाडीवड्ड यांनी वडार समाजाच्या गडहिंग्लज उपविभागाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. अत्याळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे माजी चेअरमन,लक्ष्मी विकास सेवा संस्थेचे माजी संचालक होते. त्यांच्या मागे मुलगा,मुलगी,सुन,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार (दि. ३०) सकाळी ८ वा. आहे.