गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील अरविंद आनंदराव चव्हाण (वय ७६ ) यांचे मरणोत्तर देहदान व नेत्रदान करण्यात आले. गडहिंग्लज तालुक्यातील हे चौथे देहदान तर नूलमधील चौथे नेत्रदान आहे.
अरविंद चव्हाण गडहिंग्जज साखर कारखाना व बांबवडे येथील उदयसिंह गायकवाड साखर कारखान्याकडे चिफ केमिस्ट म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले होते. प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव गडहिंग्लज येथील जनाई हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल चव्हाण व जावई डॉ.रणजीत कदम यांनी त्यांचे नेत्रदान व देहदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गडहिंग्लज येथील अंकुर आय बँकेच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली. तर कोल्हापूर येथील डॉ. डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेज येथे देहदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा,मुलगी, सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे.