गडहिंग्लज प्रतिनिधी : कोले,हत्ती,शण्मुगम स्मुती चषक शालेय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चौदा वर्षे गटात साधना हायस्कूल,शिवराज विद्यालयाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. सोळा वर्षे गटात न्यू होरायझन स्कूल, जागृती हायस्कूलने दमदार सुरुवात केली. गारगोटीच्या शाहू कुमार भवन प्रशालेने दोन्ही गटात लक्षवेधी विजय नोंदविला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शिवराज महाविदयाल्याच्या मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेचे चौदावे वर्ष आहे.
गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे संचालक संभाजी शिवारे यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उदघाटन केले. स्पर्धा प्रमुख श्रवण जाधव यांनी स्वागत केले. मनिष कोले यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. यावेळी ओमकार जाधव,सागर पोवार,सुरज कोंडूस्कर यांच्यासह क्रीडा शिक्षक, खेळाडू उपस्थित होते. समन्वयक सश्रृत सासने यांनी आभार मानले. सोळा वर्षाखालील गटात न्यू होरायझन स्कुलने क्रिएटिव्ह स्कुलला एका गोलन नमविले. होराझनच्या ओमकार चौगुले याने महत्वपूर्ण गोल मारला.जागृती हायस्कुलने गिजवणे हायस्कूलचा (माळ मारूती) २-० असा पराभव केला. जागृतीच्या आर्यन शेटके,वेदांत कडूकर यांनी गोल केले. गारगोटी शाहू कुमार भवनने एम.आर.हायस्कूलला ३-० असे हरविले. गारगोटीच्या गुरु चौगुलेने दोन तर कार्तिक महाजनने एक गोल मारला.
चौदा वर्षे गटात साधना हायस्कूलने वि.दि.शिंदे स्कु्लचा टायब्रेकवर ३-२ असा पराजय केला. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत होता. शिवराज स्कुलने केदारी रेडेकर पब्लिक स्कूलचा २-० असा पराभव केला. शिवराजच्या श्रेयस सासनेने दोन गोल करून मोलाची कामगिरी केली. गारगोटी शाहू कुमार भवनने शिवाजी विद्यालयाला सडनडेथवर १-० असे नमवुन धक्कादायक विजयाची नोंद केली. पुर्ण वेळेसह टायब्रेकरमध्ये सामना बरोबरीत सुटला होता. शिवाजीच्या श्रीराज सरदेसाईने तर गारगोटीच्या यश वर्धनने मैदानी गोल केले. सुरज हनिमनाळे,अमर गवळी,सक्षम तोंदले,सर्वेश मोरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.