गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारपासून (ता.१५) रुद्राप्पा हत्ती, आप्पासाहेब कोले, शण्मुगम स्मृतीचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे. चौदा आणि सोळा वर्षाखालील अशा दोन गटात या स्पर्धेची चढाओढ रंगणार आहे. स्पर्धेचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. तीन दिवस एम.आर.हायस्कुल मैदानावर नाईन साईट पध्दतीने ही स्पर्धा होईल.
या केंद्राला दिवाळीतील लोकवर्गणीतून अर्धशतकाहून अधिकची आंतरराज्य फुटबॉल स्पर्धांची परंपरा आहे. अजित क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रूद्राप्पा हत्ती आणि सहकाऱ्यांनी ही परंपरा दोन दशके रुजवली. त्यामुळे गडहिंग्लज म्हणजे फुटबॉल हे समीकरण आकाराला आले. एम.आर.हायस्कुलचे माजी क्रीडा शिक्षक आप्पासाहेब कोले यांनी अनेक फुटबॉल खेळाडू तयार करून गडहिंग्लजचा नावलौकीक वाढविला. पुण्याचे पंच शण्मुगम यांनी अजित क्रीडा मंडळाच्या स्पर्धा यशस्वी करणेसाठी अथक मेहनत घेतली. या सर्वांच्या योगदानाची नव्या पिढीला ओळख व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते.
स्थानिक शालेय संघाना नव्या हंगामात आपल्या तयारीची चाचपणी करता यावी यासाठी पावसाळ्यातच या स्पर्धा होतात. ग्रामीण भागातील गिजवणे, गारगोटी या संघाना निंमत्रित करण्यात आले आहे. चौदा आणि सोळा वर्षाखालील विजेत्या, उपविजेत्या संघासह उत्कृष्ठ गोलरक्षक,बचावपटू,मध्यरक्षक, आघाडीपटू यांना बक्षिसे आहेत. बाद पध्दतीने हि स्पर्धा होईल. शनिवारी दुपारपासून प्राथमिक तर रविवारी उपांत्य फेरीचे सामने आहेत. सोमवारी सायंकाळी पाच वाजता अंतिम सामने होतील. तरी शालेय संघानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी,उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी केले आहे. समन्वयक श्रवण जाधव,सश्रृत सासने आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.