गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज,आजरा तालुक्यात सुरु असलेल्या नेत्रदान चळवळीत एकाच दिवशी दोघांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. वसंत दत्ताराम ढवळ (रवळनाथ कॉलनी, आजरा) व पांडुरंग रामू जाधव (करंबळी, ता. गडहिंग्लज) यांच्या नेत्रदानाने चळवळीला बळ मिळाले आहे. एकाच दिवशी दोघांचे नेत्रदान होण्याची चळवळीत प्रथमच घटना घडली आहे.
आजरा येथील वसंत ढवळ काही दिवसापासून आजारी होते. त्यांचे बुधवारी (ता.७) सायंकाळी निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी चळवळीतील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. वसंत यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने आजरा येथे ढवळ यांच्या घरी जावून नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. आजरा शहरातील हे पहिलेच नेत्रदान ठरले.
दरम्यान, करंबळी येथील पांडुरंग जाधव यांचेही बुधवारी सायंकाळी निधन झाले. चळवळीचा प्रारंभ झालेल्या अत्याळ येथील महाराष्ट्र हायस्कूलचे ते माजी मुख्याध्यापक होते. चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. जाधव कुटुंबीयांनी मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करीत कृतिशील वारसा कायम ठेवला. करंबळीतील हे पाचवे नेत्रदान ठरले. तर चळवळीत आतापर्यंत नेत्रदानाचा आकडा १०२ वर पोचला आहे. ढवळ व जाधव कुटुंबीयांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.