Home व्यवसाय अंधांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीचा प्रारंभ : ‘सीईओं’नी स्वत:च खरेदी करीत घातला कृतिशील आदर्श

अंधांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीचा प्रारंभ : ‘सीईओं’नी स्वत:च खरेदी करीत घातला कृतिशील आदर्श

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : मरणोत्तर नेत्रदान चळवळीमार्फत अंध व्यक्तींना एलईडी बल्ब, माळा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. अंधांकडून आता या वस्तूंची प्रत्यक्ष निर्मिती केली जात आहे. त्यांच्यासाठी येथील कचेरी रोडवर रोजगार केंद्र सुरु केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संतोष पाटील यांनी स्वत:च खरेदी करीत अंधांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीचा प्रारंभ केला. यातून कृतिशील आदर्श घालून दिला.

मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा दुसरा टप्पा म्हणून अंधांना रोजगार उपलब्ध करुन दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापूर्वी अंधांची रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेत १२ अंध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यांना एलईडी बल्ब, माळा, एलईडी ट्यूबलाईट, सोलरच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी येथील कचेरी मार्गावर अंधांचे रोजगार केंद्र सुरु केले आहे. पंचायत समितीने त्यासाठी जागा उपलब्ध करुन देत सहकार्य केले आहे.

दरम्यान, या केंद्राला संतोष पाटील यांनी भेट दिली. अंधांशी संवाद साधत बल्ब, माळा तयार करण्याची प्रक्रिया समजावून घेतली. त्यांनी परिस्थितीवर मात करीत कशी वाटचाल केली हे जाणून घेतले. आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही दिली. अंधांनी तयार केलेल्या वस्तूंची स्वत: खरेदी करीत विक्रीचा अनोख्या पद्धतीने प्रारंभ केला. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनीही यावेळी वस्तूंची खरेदी केली. जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, गटविकास अधिकारी शरद मगर यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी- कर्मचारी, चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील पहिलाच बचत गट…
गावागावात महिलांचे बचत गट आहेत. अगदी दिव्यांगांचेही बचत कार्यरत आहेत. पण, अंधांचा बचत नव्हता. गडहिंग्लज तालुक्यातील अंधांना एकत्र करुन त्यांचा दीपस्तंभ स्वयंसहाय्यता समुह या नावाने बचत तयार करण्यात आला आहे. राज्यातील हा पहिलाच बचत गट आहे, हे विशेष. यातील अंधांनी तयार केलेल्या उत्पादनांची ‘दीपस्तंभ’ या ब्रँडखालीच विक्री केली जात आहे.

Related Posts

Leave a Comment