गडहिंग्लज प्रतिनिधी : ते सारे एकाच बॅचचे माजी विद्यार्थी. इतरांसारखाच त्यांचाही व्हॉट्सॲप ग्रुप आहे. वर्षभर ज्याला जमेत तसा निधी ते ग्रुप ॲडमिनकडे जमा करतात. दरवर्षी मे महिन्यात एकत्र येत समाजातील अडल्या-नडलेल्याला आर्थिक आधार देतात. यंदा आठव्या वर्षीही त्यांनी ही परंपरा कायम राखली. पतीचे आकस्मिक निधन झालेल्या वर्गमैत्रिणीला ५० हजार रुपयांची मदत केली. अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या सन १९९७-९८ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या या अनोख्या गेट-टुगेदरचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र हायस्कूलच्या दहावीच्या बॅचचे हे माजी विद्यार्थी २०१८ साली प्रथम एकत्र आले. त्या वर्षी आई-वडील गमावलेल्या विद्यार्थीनीच्या नावे ४० हजारांची यशवंत ठेव ठेवली. दुसऱ्या वर्षी प्राथमिक शाळेच्या नावावर ६० हजार रुपयांची ठेव ठेवली. त्याच्या व्याजातून मिळणारी रक्कम दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी वापरली जाते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामस्थांना औषधांचे वाटप केले. तर दुसऱ्या लाटेत या उपक्रमात खंड पडला होता. त्यानंतर शेजारच्या बेळगुंदी प्राथमिक शाळेला ३० हजारांचा निधी दिला. तर गतवर्षी आर्थिक अडचणीतील वर्गमित्राच्या नावावर ४० हजार रुपयांची ठेव ठेवली होती.
दरम्यान वर्गमैत्रिण रेश्मा पाटील-देसाई हिच्या पतीचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. कुटुंबाचा गाडा यापुढे तिला एकटीला हाकावा लागणार आहे. या परिस्थितीचा विचार करुन या वर्गमैत्रिणीला आर्थिक आधार देण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. त्यानुसार बेळगाव येथे जाऊन तिची भेट घेतली. तिच्यासह तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ५० हजार रुपयांची आर्थिक मदत तिच्याकडे सुपूर्द करत अडचणीच्या काळात तिच्यामागे भक्कमपणे उभा राहण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.