गडहिंग्लज प्रतिनिधी : कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशनमार्फत (केएसए) सुरु असलेल्या गडहिंग्लज ग्रामीण फुटबॉल लीगचे उर्वरित सामने शनिवारपासून (ता.२२) सुरु होत आहेत. लीगचे चार सामने शिल्लक असून विजेत्या आणि उपविजेत्याची उत्सुकता लागून राहिली आहे. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिशनने लीगचे संयोजन केले आहे. शिवराज महविदयालयाच्या मैदानावर सायंकाळच्या सत्रात दोन दिवस हे सामने होतील.
स्पर्धेत पाच संघाचा सहभाग असून आजअखेर सहा सामने झाले आहेत. यात माजी विजेता गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ‘अ’ संघाने आपले तीनही सामने जिंकून ९ गुणासह तकत्यात आघाडी राखली आहे. संयुक्त भिमनगरने पहिल्या सामन्यातील मोठ्या पराभवातून सावरत लागोपाठ दोन सामने जिकूंन आव्हान टिकविले आहे. सॉकर ट्रेनिंग सेंटरने एकमेव विजयासह ३ गुणासह तिसरे स्थान मिळविले आहे. गत उपविजेता काळभैरी रोड फुटबॉल क्लब आणि नवोदित गडहिंग्लज युनायटेड ‘ब’ संघाना आपल्या दोन्हीं सामन्यात पराभव पत्करल्याने गुणाचे खाते उघडता आलेले नाही.
शनिवारी दुपारी दोन वाजता काळभैरी रोड फुटबॉल क्लब विरुध्द गडहिंग्लज युनायटेड असोसिएशन ‘ब’ यांच्यात सामना आहे. दुपारी साडे तीन वाजता सॉकर ट्रेनिंग सेंटर वि. संयुक्त भिमनगर क्लब यांच्यात महत्वाचा सामना आहे. रविवारी दु. २ वा. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ‘ब’ वि. सॉकर ट्रेनिंग सेंटर यांच्यात लढत होईल. लीगचा शेवटचा सामना गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ‘अ’ विरूध्द काळभैरी क्लब यांच्यात साडे तीन वाजता आहे. या सामन्यानंतर लीगमधील विजेत्या आणि उपविजेत्यांना बक्षिसे दिली जातील.