कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तज्ञ संचालकपदी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची सर्वानुमते निवड झाली. आज पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री श्री.मुश्रीफ यांनी श्री.घाटगे यांच्या निवडीची सूचना मांडली तर माजी खासदार संजय मंडलिक यांनी अनुमोदन दिले.
यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, १९९८ साली विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेले माजी आमदार संजयबाबा घाटगे गेली ३० वर्ष सामाजिक,सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. सहकारी पाणीपुरवठा संस्था नफ्यात येत नाहीत हे माहीत असूनसुद्धा त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अन्नपूर्णा पाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक-एक व टप्पा क्रमांक-दोन पूर्ण केल्या. उंचच उंच डोंगर कपारीतील पांढऱ्या पट्ट्याला पाणी देऊन त्यांनी हरितक्रांती केली. १५ किलोमीटर अंतराच्या अटीमुळे त्यांना साखर कारखाना काढता येत नव्हता म्हणून त्यांनी जॅगरी प्रकल्प काढला. तोट्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था नफ्यात आणण्यामध्ये आणि बंद पडलेल्या पाणीपुरवठा संस्था चालू करण्यामध्ये त्यांचे योगदान मिळेल.
माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक म्हणाले, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या माध्यमातून सहकाराला आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांना न्याय मिळेल. त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी ठसा उमटविला असून मोलाची कामगिरी केली आहे.
आमदार राजेश पाटील म्हणाले, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी सदैव शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच काम केले आहे. शेतकऱ्याच्या ऊसाला चांगला भाव मिळावा म्हणून अन्नपूर्णा जॅगरी प्रकल्प काढून त्यांनी तो चांगल्या पद्धतीने चालविला आहे. जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा संस्थांना त्यांच्या कामाचा आणि अनुभवाचा चांगला उपयोग होईल.
निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांचा आणि या बँकेच्या सत्तेचा कधीही संबंध आला नाही. परंतु पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी तो योग घडवून आणला. सहकार ही सर्वसामान्य माणसांची चळवळ आहे. ही चळवळ शिखरावर पोहोचविण्याचे काम केडीसीसी बँकेने मोठ्या सामर्थ्याने केले. त्यामुळेच ही बँक राज्यासह संबंध देशांमध्ये अग्रणी बनली आहे. जी शिस्त आयुष्यभर पाळली ती शिस्त या संस्थेतही पाळू आणि बँकेसह शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कटिबद्ध राहू असेही ते म्हणाले. गेली २५ वर्ष कोणतीही सत्ता नसतानाही कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी राहिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी केडीसीसी बँकेचे बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे,माजी खासदार प्रा.संजय मंडलिक,आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,आमदार राजेश पाटील,माजी खासदार डॉ.श्रीमती निवेदिता माने, प्रताप उर्फ भैय्या माने,बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर,संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील,सुधीर देसाई, विजयसिंह माने,श्रुतिका काटकर,स्मिता गवळी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.
स्मरण कै. पी. एन. पाटील यांचे….!
माजी आमदार संजय बाबा घाटगे भाषणात म्हणाले, या सभागृहात तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती झाल्याचा मला आनंदच आहे. माजी आमदार स्वर्गीय कै. पी. एन. पाटील यांची आठवण नाही केली तर ते चुकल्यासारखं होईल. ते जेवढे माझे जवळचे मित्र होते, तेवढेच आम्ही त्यांना मानत भही होतो.
विधानसभेला जास्त राबूया…!
निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार श्री. घाटगे म्हणाले, मी संचालक होण्यापेक्षाही माझ्या कार्यकर्त्यांचे स्वास्थ्य सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. येत्या विधानसभेमध्ये आपल्या निवडणुकीसाठी जेवढं राबलो नाही त्यापेक्षा जास्त राबून मोठ्या मताधिक्याने मंत्री श्री. मुश्रीफ यांना पुन्हा आमदार करूया …!