Home Uncategorized खेळ अभ्यासापेक्षाही अधिक शिकवतो : हर्षवर्धन बी.जे. युनायटेड उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा समारोप

खेळ अभ्यासापेक्षाही अधिक शिकवतो : हर्षवर्धन बी.जे. युनायटेड उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा समारोप

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : ‘’आज सर्वच पालक आपल्या पाल्याने अभ्यासाच्या टक्केवारीत पुढे जावे यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे पाल्यावर शैक्षणिक ताण येण्यासह अनेक प्रश्न निमार्ण होत आहेत. पण जीवनात यशस्वी होणेसाठी केवळ वर्गातील शिक्षण पुरेसे नाही. तुलनेत मैदानी खेळ विद्यार्थ्यांना वर्गातील अभ्यासापेक्षा अधिक जीवन कौशल्ये शिकवितात असे मत प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांनी व्यक्त केले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि श्री.रावसाहेबआण्णा कित्तुरकर विश्वस्त संस्थेमार्फत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.

गेली बारा दिवस एम.आर. हायस्कुलच्या मैदानावरील शिबिरात १५० नवोदितांनी सहभाग घेतला. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात शिबिरातील उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून हमझा रिझवी,सोहम धुमाळ,आरोही कांबळे, कैवल्य वाटवे यांचा श्री.हर्षवर्धन यांच्या हस्ते क्रीडा साहित्य देऊन सत्कार झाला. श्री. हर्षवर्धन म्हणाले, ‘’आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक आव्हाने आहेत. त्यांना सामोरे जाताना अनेकदा अपयश येण्याची शक्यता आहे. पण या अपयशातून उभारी घेण्याची मानसिकता केवळ खेळातून निर्माण होते.’’

यावेळी शिबिर समन्वयक सुल्तान शेख, सागर पोवार यांचा गौरव झाला. गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद,संचालक सुरेश कोळकी,खजिनदार महादेव पाटील, संदिप कांबळे,तानाजी देवेकर, ओमकार घुगरी,अनिकेत कोले,प्रसाद पोवार,श्रवण पाटील यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. यश पाटील यांनी सुत्रसंचलन केले.

चौकट…
मैदानात खेळा..व्याधी पळवा
नवी पिढी मैदानापासून दुरावू लागल्याने तरुण वयातच अनेक व्याधी जडत आहेत. त्यासाठी नवोदितांनी बालपणापासून मैदानात खेळत व्याधी दुर पळवाव्यात. त्यामुळे पालकांनी अभ्यासाप्रमाणेच पाल्याच्या आरोग्यासाठी जागरूक राहून किमान रोज एक तास मैदानावर त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन श्री.हर्षवर्धन यांनी केले.

Related Posts

Leave a Comment