गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे दिवाळीत ६ ते १२ नोव्हेंबर अखेर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी तीन लाख रुपयांची रोख पारितोषिके आहेत. स्पर्धेत पंजाब,गोवा,केरळ,कर्नाटक, तामीळनाडू आणि महाराष्ट्रातील मात्तब्बर १६ संघ सहभागी आहेत. एम.आर. हायस्कुलच्या मैदानावर लोकवर्गणीतून होणाऱ्या युनायटेड करंडक या स्पर्धेचे यंदाचे एकोणीसावे वर्ष आहे.
येथील अजित क्रीडा मंडळाने सत्तरच्या दशकात लोकवर्गणीतून आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेचा श्रीगणेशा केला. गेल्या अठरा वर्षापासून हि पंरपंरा गडहिंग्लज युनायटेडने कायम ठेवली आहे. पुर्वी केवळ गोवा, महाराष्ट्र आणि लगतच्या कर्नाटकपुरती असणाऱ्या या स्पर्धेचा विस्तार केरळ, पंजाबपर्यंत वाढविला आहे. यंदा ६ ते १२ नोव्हेंबर अखेर हि स्पर्धा होणार असल्याची माहिती युनायटेडचे अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी, उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी दिली. विविध संघ आणि देणगीदाराशी संम्पर्क साधून स्पर्धेची तयारी सुरु केली आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील सहभागी संघाची दोन्हीं वेळेचा प्रवास खर्च, भोजन आणि निवासाची सोय आहे. स्पर्धेसाठी विजेता,उपविजेता,तृतीय आणि चतुर्थ क्रमाकांसाठी एकुण तीन लाख रुपयांची पारितोषिके आहेत. संचालक प्रा.सुनिल शिंत्रे,सतिश पाटील,जगदिश पट्टणशेट्टी,संभाजी शिवारे,अरविंद बार्देस्कर,मल्लिकार्जून बेल्लद,आनंद पाटील,शक्ती चौगुले, महादेव पाटील,प्रशांत दड्डीकर,मनिष कोले,भैरू सलवादे,समन्वयक संतोष निळकंठ,सुल्तान शेख आणि खेळाडू स्पर्धेची तयारी करीत आहेत.
लोकवर्गणीची पंरपंरा
गडहिंग्लज या छोट्या शहरात कोणताही कार्पोरेट पुरस्कर्ता नाही. पण, शतकभरापासून स्थानिकांनी फुटबॉलला लोकाश्रय दिल्याने गडहिंग्लज म्हणजे फुटबॉल असा केवळ राज्यात नव्हे तर देशात नावलौकिक झाला आहे. लोकवर्गणी आणि भोजन विभागासाठी धान्य जमा करून या दिवाळीतील स्पर्धांची परंपरा जपली आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात सोयी सुविधांचा अभाव असतानाही दरवर्षी परराज्यातील अव्वल संघ स्पर्धेला हजेरी लावून गडहिंग्लजच्या फुटबॉल प्रेमाला दाद देतात.