गडहिंग्लज प्रतिनिधी : आंतरराज्य महाविद्यालय स्पर्धेच्या अंतिम फुटबॉल सामन्यात मंगळूरच्या येनिपुईया महाविद्यालयाने स्थानिक शिवराज महाविद्यालयाचा ४-१ असा पराभव करून विजेतेपदासह ऱोख ११ हजार रुपये आणि युनायटेड चषक पटकाविला. निपाणीच्या व्हिएसएम महाविद्यालयाने चंडगडच्या माडखोलकर महाविद्यालयावर ३ गोलनी मात करून तिसरा क्रमांक मिळविला. गेले दोन दिवस येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम.आर.हायस्कुलच्या मैदानावर या आंतरराज्य आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धा सुरु होत्या.
अंतिम सामन्यात शिवराज महाविद्यालयाला साखळी सामन्यात मंगळूरला झूंजवण्या-या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. पूर्वार्धात दहाव्या मिनिटाला मंगळूरचा आघाडीपटू सिन्ननने मैदानी गोल करून खाते उघडले. अठाव्वीसव्या मिनिटाला सिम्रनने आपला वैयक्तीक आणि संघाचा दुसरा गोल करून सामन्यावर पकड मजबूत केली. उत्तरार्धातही मंगळूरने वर्चस्व गाजवले. ४९ व्या मिनिटाला अजयनने संघाचा तिसरा गोल करून आघाडी भक्कम केली. ५१ व्या मिनिटाला शिवराजच्या विद्याधर धबालेने उत्कृष्ट गोल करून सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. पण,मंगळूरच्या आफ्रिदने चौथा गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले. स्थानिक संघाचा पराभव झाल्याने शौकीनांची निराशा झाली. अंतिम सामन्यानंतर सेवानिवृत्त परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी,युनायटेडचे अध्यक्ष डॉ.रविंद्र हत्तरकी,उपाध्यक्ष सुरेश कोळकी, निवृत्त पोलीस निरिक्षक महादेव तोंदली,युवराज कित्तुरकर यांच्याहस्ते विजेते, उपविजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला.
यावेळी बाळगोंडा पाटील, महादेव पाटील,संदिप मिसाळ,प्रशांत दड्डीकर,लता हत्तरकी यांच्यासह खेळाडू, शौकीन उपस्थित होते. यावेळी स्पर्धा समन्वयक ओमकार घुगरी यांचा श्री.आजरी यांच्या हस्ते सत्कार झाला. मनिष कोले यांनी आभार मानले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट
स्पर्धावीर- अफसल जे. (मंगळूर)
गोलरक्षक- अमर गवळी (शिवराज)
बचावपटू- मतीन नाईक ( चंडगड)
मध्यरक्षक- जीत फुटाणकर (निपाणी)
आघाडीपटू- सिन्नन के ( मंगळूर)