Home Uncategorized ‘शक्तिपीठ’ शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही : मंत्री हसन मुश्रीफ

‘शक्तिपीठ’ शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही : मंत्री हसन मुश्रीफ

by Nitin More

कोल्हापूर प्रतिनिधी : ‘शक्तिपीठ’ महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही किंबहुना; तो कोणावरही लादला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली असल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोल्हापुरात मंत्री श्री.मुश्रीफ यांना पत्रकारांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत विचारले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शक्तिपीठाबद्दल तीन विषय होते. एक म्हणजे शक्तीपीठ रस्त्याला मान्यता देणे. दुसरा शक्तिपीठ रस्त्याच्या खर्चासाठी बारा हजार कोटी निधी उभारणीला मान्यता देणे आणि त्यासाठी कर्ज उभारणे. तिसरा विषय होता तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील भूमी संपादनाची रद्द केलेली कारवाई पुनर्स्थापित करणे. पहिले दोन विषय मंजूर झाले आणि तिसऱ्या विषयाबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मी, आम्ही भावना व्यक्त केलेल्या आहेत. आम्ही सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, हे शेतकरी फार जिद्दीने शेती करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील क्षेत्र बागायती आहे आणि या जमिनी शेतकऱ्यांचे काळीज आहे. त्यामुळे या जमिनी सहजासहजी द्यायला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील जमीन संपादनाची अधिसूचना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रद्द करण्यासाठी आम्हा सर्वच लोकप्रतिनिधींना मोठे सहकार्य केले होते.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, त्यावेळी आम्हीही मांडले होते की त्याचे फार मोठे परिणाम लोकसभा निवडणुकीला झाले होते. ही अधिसूचना रद्द केली नसती तर विधानसभेलाही त्याचे दुष्परिणाम होणार होते. आता मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले आहे की, हे जरी खरं असलं तरी समृद्धी महामार्गामुळे राज्याचा विकास झालेला आहे. समृद्धी महामार्ग होत असतानाही असाच विरोध होत होता. बाजारभावापेक्षा चार-पाचपटीने मोबदला दिल्यामुळे शेतकरी तयार झाले आणि आज तो रस्ता झाल्यानंतर तिथली समृद्धी बघा. त्यामुळेच जमिनीच्या किमती वाढत आहेत. रस्त्याला पेट्रोल पंप व इतर अनुषंगिक सोयी- सुविधा वाढत आहेत. तसेच बेरोजगारांनाही काम मिळत आहे.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या या बैठकीतच सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी आपण पन्हाळगडावर कार्यक्रमासाठी आलो असता कोल्हापूर विमानतळावर 400 ते 500 शेतकरी येऊन भेटले. त्यांनी निवेदन दिले की,जमिनीसाठी चांगला मोबदला मिळणार असेल तर आम्ही जमिनी देण्यासाठी तयार आहोत. त्यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या सह्या आणि जमिनी तपासा व खातरजमा करा असेही सांगितल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. तिथेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असेही सांगितले आहे की, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय व शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढील काम होणार नाही.

मी व्यक्तिगत कामानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असता त्यांनी आम्हाला हेही सांगितले की, कोल्हापूरला करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणारी भाविकांची वाढलेली संख्या, तीर्थक्षेत्र आदमापुर येथे श्री.बाळूमामा यांच्या दर्शनासाठी येणारी वाढतच चाललेली भाविकांची संख्या;तसेच हा रस्ता झाल्यानंतर या तीर्थस्थळांची भाविक संख्या दहापटीहून अधिक वाढेल. लोकांचे उत्पन्न वाढेल बेरोजगारीही कमी होईल आणि याबाबत लोकांना समजावून सांगा. अयोध्या असेल, उज्जैन असेल…. ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्रांची कामे झाली आहेत, तिथे वीसपटीने गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे तिथे दरडोई उत्पन्नामध्ये आणि रोजगारांमध्येही वाढ झालेली आहे. अर्थात विरोधक विरोध करणारच त्यांचे ते कामच आहे. परंतु मुख्यमंत्री म्हणाले होते की शक्तीपीठ हा रस्ता आम्ही करणारच. परंतु; तो कोणावरही लादणारही नाही.

यावर एम.एस.आर.डी.सी. ने तीन- चार पर्याय आणलेले आहेत. त्या पर्यायांवर चर्चा झालेली नाही. दरम्यान आम्हाला लोकप्रतिनिधींना ज्यावेळी बोलावून घेतील, त्यावेळी ते तीन-चार पर्याय सांगतील. जिथे- जिथे विरोध असेल तिथे-तिथे ती लाईन बदलून कशी घ्यायची हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सरकारचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. हे काय सरकारने लपवून ठेवलेले नाही. एम.एस.आर.डी.सी मध्ये मी पर्याय सुचविला होता की, सांगलीपासून कोल्हापूरच्या राष्ट्रीय महामार्गापर्यंत राष्ट्रीय शक्तिपीठ महामार्ग येणारच आहे. तिथून करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिर आणि श्री. बाळूमामा देवालय या दोन मंदिरांकडे जायचे आहे आणि त्यानंतर तो पत्रादेवीला जाणार आहे. त्यासाठी आपल्याकडे रस्ते तयार आहेत. समांतर रस्तेही तयार झालेले आहेत. तसेच यापूर्वी झालेल्या रस्त्यांमुळे महापूर येत असल्याच्या संकटाकडेही आम्ही लक्ष वेधले आहे.

Related Posts

Leave a Comment