गडहिंग्लज प्रतीनिधी : नागपूर गोवा शिघ्रगती “शक्तीपीठ” महामार्गाची कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मौल्यवान जमीन संपादन न करता मार्गिका बदलून पुर्णत्वास न्यावा अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेल पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हंटले आहे की,कोल्हापूरची श्री.महालक्ष्मी,तुळजापूरची श्री. तुळजाभवानी,माहुरची श्री.रेणुका देवी आणि सप्तशृंग गडाची श्री. सप्तशृंगी देवी ह्या महाराष्ट्रातील परम पवित्र साडेतीन शक्तिपीठांना जोडणारा नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग महायुती सरकारचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. शिघ्रगती महामार्गामुळे साडेतीन शक्तिपीठांबरोबरच पंढरपूरचे श्री.विठ्ठल रखुमाई, कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीचा देव ज्योतीबा,आदमापुरचे श्री.संत बाळुमामा देवस्थानही जोडले जाणार आहे.
दळणवळणाची सोय झाल्याने तीर्थक्षेत्र पर्यटनाबरोबरच,व्यापार, उद्योग,शैक्षणिक आणि कृषी विकासाला सुध्दा मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. शक्तीपिठ महामार्गमुळे समृध्दी महामार्ग आणि नागपूर रत्नागिरी महामार्गामुळे राज्य सिमावर्ती त्रिकोण तयार होऊन महाराष्ट्र राज्याची आंतरराज्य कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यातुन जातो. नागपूरपासुन सांगली फाट्याजवळील तावडे हाॅटेल पर्यंत कोणतीही अडचण नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मौल्यवान बागायती जमिनी संपादित न करता कोल्हापूर जिल्ह्यातील नियोजित मार्गिका बदलून तो महामार्ग पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 ने कागल, निपाणी मार्गे संकेश्वर व तिथुन गडहिंग्लज,आजरा मार्गे NH548H ह्या नुकत्याच बांधलेल्या महामार्गाने प्रस्तावित भारतातील सर्वात लांब आंबोली दुहेरी बोगद्यातून पत्रादेवी,बांदा,गोवा असा 86000 कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग पुर्णत्वास न्यावा अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे.