Home Uncategorized ‘फुटबॉल’ खेळ नसून जीवनकौशल्ये शिकवणारा ‘गुरू’ आहे : बिबियानो फर्नांडिस

‘फुटबॉल’ खेळ नसून जीवनकौशल्ये शिकवणारा ‘गुरू’ आहे : बिबियानो फर्नांडिस

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : ”गेल्या दशकभरापासून भारतीय फुटबॉलमध्ये मोठे बदल घडत आहेत. खासकरून प्रशिक्षित प्रशिक्षकासह कुमार आणि युवा खेळाडू मोठ्या संख्येने फुटबॉलकडे वळत आहेत. आशियाई स्तरावर सतरा आणि वीस वर्षाखालील वयोगटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी आहे. परिणामी, कुमार आणि युवा प्रतिभावान खेळाडूंना सातत्याने पाठबळ दिल्यास भारत नक्कीच एक दिवस विश्वचषक स्पर्धा खेळेल” असा विश्वास युवा भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक गोव्याचे बिबियानो फर्नांडिस यांनी आज येथे व्यक्त केला.

येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत खेळाडूंच्या गौरव समारंभात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नवाज मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, क्रीडाधिकारी सौ. मनीषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीला श्री फर्नाडिंस यांच्याहस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरवात झाली. युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी स्वागत केले. सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात वर्षभरातील खेळाडूंची कामगिरीसह बाल, कुमार, युवा आणि वरिष्ट स्तरासाठी आयोजित केलेल्या स्पर्धांचा आढावा घेतला.
यासीन नदाफ,सागर पोवार,श्रवण जाधव,तानाजी देवेकर,सश्रृत सासने यांच्यासह बंगळूर,कोल्हापूर स्पर्धेत यश मिळविलेल्या ५० खेळाडूंचा क्रीडा साहित्य देऊन गौरव झाला.

यावेळी श्री.फर्नाडीस म्हणाले, फुटबॉल हा केवळ खेळ नसून जीवनकौशल्ये शिकवणारा गुरू आहे. खेळाडू म्हणून गडहिंग्लजचे फुटबॉलवेड मला अनुभवयाला मिळाले आहे.” श्री आबीटकर
म्हणाले, ” नव्या पिढीसाठी मैदानी खेळ अत्यावश्यक आहेत. मैदानापासून दुरवण्याचा धोका असल्याने फुटबॉलच्या माध्यमातून युनायटेड नवोदितांना देत असलेली संधी कौतुकास्पद आहे.” सौ. पाटील म्हणाल्या, ”गडहिंग्लज उपविभागातील खेळाडूत टँलेन्ट आहे. शासनाचे खेळ आणि खेळाडूंना बळ देण्याचे धोरण आहे.”

यावेळी संभाजी शिवारे,महादेव पाटील,शक्ती चौगुले,प्रशांत दड्डीकर, एन.बी.अरळी, टि.बी.चव्हाण यांच्यासह माजी फुटबॉल खेळाडू, पालक उपस्थित होते. मनिष कोले यांनी आभार मानले. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले.

फुटबॉलशी मैत्री करा
सरावाबाबत मार्गदर्शन करताना श्री फर्नांडिस म्हणाले, ”खेळाडूंनी फुटबॉलशी मैत्री करायला हवी. प्रतिस्पर्ध्या शिवाय होणारा सराव कुचकामी आहे. कारण प्रतिस्पर्ध्या विरुद्ध खेळल्यावरच निर्णय क्षमता वाढते. खेळतानाच्या अडचणीं सोडविण्याचे तंत्र विकसित करायला हवे. निरीक्षणातून बदल करत सातत्य राखणाराच विजयाचे लक्ष्य गाठू शकेल.”

Related Posts

Leave a Comment