गडहिंग्लज, ता. १८ : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील आनंदा दत्तू सुतार (वय ६७) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. ऐनापूर गावातील हे १३ वे तर गडहिंग्लज व आजरा तालुक्यात सुरु असलेल्या चळवळीतील १०७ वे नेत्रदान ठरले.
आनंदा सुतार यांना आज सकाळी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. अचानक घडलेल्या या घटनेने सुतार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. नेत्रदान चळवळीच्या ऐनापूर गावातील कार्यकर्त्यांनी सुतार कुटुंबीयांना आनंदा यांच्या नेत्रदानाबाबत विचारणा केली. दु:खद प्रसंग असूनही सुतार कुटुंबीयांनी नेत्रदान करण्यास संमती दिली.
येथील अंकूर आय बँकेच्या पथकाला माहिती देण्यात आली. अंकूरच्या पथकाने ऐनापूर येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. सुतार कुटुंबीयांच्या सामाजिक बांधलकीचे कौतुक होत आहे. आनंदा सुतार यांच्या मागे पत्नी,दोन मुले, मुलगी,सून,भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता.१९) सकाळी नऊला आहे.