Home Uncategorized ‘राज्यपाल आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराचे पंचवीस हजार मैदानासाठी : उदय पुजारी

‘राज्यपाल आदर्श पोलीस पाटील’ पुरस्काराचे पंचवीस हजार मैदानासाठी : उदय पुजारी

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : शासकिय़ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि समाजातील विविध घटकांचे सहकार्य यामुळे राज्यस्तरीय पुरस्काराची मोहोर उमटली. शालेय मुलांसाठी अभ्यासिका, वृक्ष संवर्धन आणि मैदान उभारणीसाठी पुढाकार घेतला. शासनाच्या पुरस्काराची पंचवीस हजार रुपये रक्कम भडगावातील मैदानाच्या उर्वरित विकासकामासाठी देत असल्याचे प्रतिपादन पोलीस पाटील उदय पुजारी यांनी केले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे श्री.पुजारी यांचा शासनाचा ‘राज्यपाल आदर्श पोलीस पाटील’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
येथील एम.आर.हायस्कुलच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. युनायटेडचे सचिव दिपक कुप्पनावर यांनी प्रास्ताविकात श्री.पुजारी यांच्या कार्याचा आढावा घेतला. युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे यांच्या हस्ते शाल,रोपटे आणि स्मृतीचिन्ह देऊन श्री.पुजारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री.शिवारे म्हणाले, ”युनायटेड संस्थेमार्फत भडगाव फुटबॉल असोसिएशनला गेल्या तीन वर्षापासून तांत्रिक मार्गदर्शन सुरु आहे. स्पर्धा,प्रशिक्षण यातून पाठबळ देताना ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रुजवण्यात श्री.पुजारी आणि सहकाऱ्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.” श्री.पुजारी म्हणाले, तालुक्यातील सर्वात मोठे आणि राजकियदृष्ट्या संवेदनशील गावाची जवाबदारी सांभाळताना अधिक जागरूकतेने काम करत आहे. नोकरीबरोबरच सामाजिक बांधलिकी म्हणून विविध उपक्रमात सक्रिय आहे. पुरस्कारामुळे जवाबदारी वाढली असून सत्काराबद्दल ऋणी आहे.

यावेळी राष्ट्रीय खेळाडू सौरभ पाटील (गोवा), महेश हासुरे,ओमकार
जाधव,सौरभ जाधव,ओमकार घुगरी,सुल्तान शेख,अनिकेत कोले,सुरज हनिमनाळे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. खेळाडू संचालक संदिप कांबळे यांनी आभार मानले.

Related Posts

Leave a Comment