गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारपासून (ता.३) पंधरा वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. युनायटेडचे माजी अध्यक्ष सुनिल चौगुले यांच्या स्मृती पित्यर्थ या स्पर्धा होत आहेत. एम.आर.हायस्कुल मैदानावर नाईन साईट पध्दतीने ही स्पर्धा होईल. स्पर्धेतून निवडलेल्या उत्कृष्ट खेळाडूंना कनिष्ठ इंडियन लीग (आय लीग) स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे.
कुमार आणि युवा फुटबॉलपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) तेरा, पंधरा आणि सतरा वर्षाखालील कनिष्ट इंडियन लीग स्पर्धा (आय लीग) सुरु केली. या वयोगटातील खेळाडूंना अधिक सामने खेळल्यास त्यांची निर्णय क्षमता अधिक विकसित होते. याच धर्तीवर युनायटेडचे माजी अध्यक्ष कै.सुनिल चौगुले यांच्या स्मृती पित्यर्थ यंदापासून १५ वर्षाखालील स्पर्धा होत आहे. ३ व ४ ऑगस्ट रोजी एम.आर. हायस्कुलच्या मैदानावर हे सामने होतील. साखळी आणि त्यानंतर बाद पध्दतीने सामने आहेत.
सन २०१० आणि सन २०११ जन्मतारिख असणारे विद्यार्थी खेळू शकतील. स्पर्धेतून निवडलेल्या उत्कृष्ट खेळाडूंना कनिष्ट आय लीग खेळण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धा नाईन साईट असून संघात चौदा खेळाडू असतील. स्थानिकांसह ग्रामीण भागातील गिजवणे,भडगाव, गारगोटी या संघाना निमंत्रित केले आहे. विजेत्या,उपविजेत्या संघासह उत्कष्ठ गोलरक्षक,बचावपटू, मध्यरक्षक,आघाडीपटू यांना बक्षिसे आहेत. तरी संघानी सहभागी व्हावे असे आवाहन गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष डॉ.रविंद्र हत्तरकी,उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी केले आहे. स्पर्धा प्रमुख सुल्तान शेख,समन्वयक पार्थ म्हेत्री,यश पाटील आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.