गडहिंग्लज प्रतिनिधी : दोन जुलै रोजी अजितदादा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली…त्यांच्यासह नऊ मंत्र्यानीही शपथ घेतली…राज्यात अवघ्या वर्षभरा नंतर दुसरा मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीत ऊभी फूट पडली तर शिंदे-भाजपा सरकारच्या बेरजेच्या राजकारणात भर पडली. राज्यात चालू असलेल्या सत्ता नाट्यावरून वेगवेगळ्या स्थरावर पडसाद उमटू लागले अन् संपूर्ण राज्याचे राजकीय संदर्भ बदलू लागले. प्रचंड टोकाची इर्षा असणारे भाजपातील व राष्ट्रवादीतील नेते मतभेद विसरून शिंदे-फडणवीस-पवार असे तीनचाकी सरकार अस्तित्वात आले. आशा राजकीय परीस्थितीत कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे हे दोन नेते राज्यातील परिस्थीती नुसार जुळवून घेतात का याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष्य लागून होते. समरजितसिंह घाटगे यांनी गुरुवारी आपली भूमिका जाहीर करत आपण भाजपाच्या कमळ चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवणार असून आपण निवडणूक जिंकलो आहोत असे सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागायला सांगितले तर नामदार हसन मुश्रीफ यांनी (शुक्रवार) रोजी दुगणी रफ्तारसे आगे बडूगां असे सांगत समरजितसिंह घाटगे यांना एकप्रकारे आव्हान दिले. त्यामुळे आगामी विधानसभेला कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे यांच्यात राज्याप्रमाणे समजोता होईल अशी शक्यता फार कमी असून याउलट दोघांत काटे की टक्कर होणार अशी चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यात जरी समजोता झाला असला तरी कागल मतदारसंघात मात्र युद्धाचे सावट गडद दिसत आहेत.
नामदार हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात गत विधानसभा निवडणुकीत काटे की टक्कर झाली होती त्यामध्ये हसन मुश्रीफ यांचा विजय झाला होता. त्यानंतर समरजितसिंह घाटगे पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये हसन मुश्रीफ ग्रामविकासमंत्री झाले. मंत्री झालेनंतर कोट्यावधीचा निधी आणून कागल विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. मंत्री पदाच्या काळात अनेक निवडणुका हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना सोबत घेऊन जिंकल्या…आशा वेळेत समरजितसिंह घाटगे यांच्या सोबत महाडिक सोडून कोणीही नव्हते पण समरजितसिंह घाटगे यांनी जिद्द न सोडता सातत्याने मतदारसंघात आपले काम चालूच ठेवले. मध्यंतरीच्या काळात हसन मुश्रीफ यांच्यावर ‘ईडी’ ने कारवाई केली, मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या सर्व घटनामागे समरजितसिंह घाटगे पाठीमागून वार करीत असल्याचा आरोप यावेळी समरजितसिंह घाटगे यांच्यावर झाला. पण काही दिवसांत राज्यसभा निवडणूक झाली अन् एकनाथ शिंदे शिवसेनेतून आमदारांसह बाहेर पडले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. भाजपा सत्तेत आले. दरम्यानच्या काळात विकासकामांच्या श्रेयवादावरून हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात स्पर्धा चालू झाली. तशीच स्पर्धा अखेर शासन आपल्या दारी या उपक्रमापर्यंत पाहायला मिळाली. त्यानंतर दोन जुलै रोजी राष्ट्रवादीतून अजित पवार यांनी ३५ ते ४० आमदार घेऊन बाहेर पडत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर नऊ मंत्र्यानीही त्यांच्यासोबत शपथ घेतली. नऊ मंत्र्यांच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
दोन जुलै रोजी अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या राज्यातील राजकारणात भडखा उडाला आणि त्याची ठिणगी कागलच्या राजकारणात पडली. शिंदे-फडणवीस-पवार असे सरकार अस्तित्वात आले. राज्याच्या राजकारणात आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतला सर्वात मोठा तीन पक्षात समजोता झाला. पण राज्यात झालेला समजोता कागलमध्ये दोन दिवसही टिकला नाही कारण समरजितसिंह घाटगे यांनी आपली उमेदवारी जाहीर करत विजयाची पायभरणीची सभा असल्याचे सांगत २०२४ ला कागल विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी,भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. तर मागील रविवारी मंत्री पदाची शपथ घेऊन आलेल्या हसन मुश्रीफ यांनी दुगणी रफ्तार से आगे बढूंगा…अशी शेर-शायरी करत समरजितसिंह घाटगे यांना आव्हान दिले. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांच्या आमदार होण्याच्या महत्वकांक्षाने दोघांत समजोता होण्या ऐवजी दोघांत खाऱ्याआर्थी युद्ध छेडले गेले आहे. त्यामुळे येथून पुढच्या काळात मंत्री हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे या दोघांचे मार्ग,विचार व ध्येय त्यांचा कधीच समजोता होऊ देणार नसल्याने…कागलमध्ये समजोता होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. नाट्यमय राजकीय घडामोडीत राज्यात जरी समजोता झाला असला तरी कागलमध्ये मात्र युद्धाचे सावट गडद झालेचे चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे.